नवी दिल्ली TDP BJP Jana Sena Alliance :देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता थोडाच अवधी शिल्लक राहिला आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. दुसरीकडे दक्षिणेत आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी भाजपा प्रादेशिक पक्षांशी चर्चा करत आहे. आता भाजपा, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या सूत्रावर सहमती झाली असून, लवकरच त्याचीही घोषणा होऊ शकते.
'टीडीपी-भाजपा आणि जनसेना यांच्यात युती' : भाजपा आणि जनसेनेसोबतच्या युतीबाबत बोलताना चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलं की, "युतीबाबत एकमत झालं आहे. एक-दोन दिवसांत अंतिम जागा जाहीर होतील." 2018 मध्ये भाजपासोबतचे संबंध तोडण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "2018 मध्ये कोणतेही वैयक्तिक मतभेद नव्हते. त्यावेळी राजकीय मतभेद होते, आता पुन्हा एकत्र काम करू असा विश्वास आहे."
जागावाटपाचा फॉर्म्युला : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 मार्च रोजी गुंटूर जिल्ह्यात टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत मोठी संयुक्त रॅली काढू शकतात. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसंच, आंध्र प्रदेशमध्ये भाजपा, चंद्राबाबू नायडू यांची तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आणि अभिनेता-राजकारणी पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत एकमत लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि जनसेनेला किती जागा मिळणार? : शुक्रवारी भाजपा, टीडीपी आणि जनसेनेची बैठक झाली आणि त्यादरम्यान मध्यरात्री तिन्ही पक्षांमध्ये जागांवर बोलणी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. भाजपा आणि जनसेनेला लोकसभेच्या 24 पैकी आठ जागा मिळण्याची शक्यता आहे. तसंच, आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना 28 ते 32 जागा मिळण्याची अपेक्षा आहे आणि टीडीपी उर्वरित सर्व जागा लढवेल. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 175 जागा आहेत. दरम्यान, टीडीपीचे ज्येष्ठ नेते किंजरापू अचनायडू यांनी विजयवाडा येथे माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "चंद्राबाबू नायडू भाजपा नेत्यांच्या निमंत्रणावरून दिल्लीत गेले होते. चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे. टीडीपी, भाजपा आणि जनसेनेने राज्यात एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे."