अमरावती- नाळ चित्रपटातला 'चैत्या' अर्थात अमरावतीचा श्रीनिवास पोकळे याला बालकलाकार म्हणून वर्ष 2022 साठीच्या साठाव्या राज्य मराठी चित्रपटाचा पुरस्कार (Rajya Chitrapat Puraskar 2022 ) घोषित झाला. 2018 मध्ये आलेल्या नाळ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणाऱ्या श्रीनिवासची आता समीर जोशी दिग्दर्शित छुमंतर या चित्रपटातील माणिक गायकवाड या पात्राच्या भूमिकेसाठी शासनाकडून पुन्हा एकदा विशेष दखल घेण्यात आली. सध्या दहावीच्या परीक्षेची तयारी करीत असणाऱ्या श्रीनिवास पोकळे याला जाहीर झालेल्या या पुरस्कारासंदर्भात ईटीव्ही भारतनं त्याच्याशी खास संवाद साधला.
लॉकडाऊन काळात लंडनमध्ये शूटिंग- छुमंतर या सिनेमाचं शूटिंग लॉकडाऊन काळात लंडनमध्ये झालं. या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, रिंकू राजगुरू, सूव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे कलाकारसोबत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानदेखील नाळप्रमाणेच मजा आली. रिंकू राजगुरू यांनी डायट कसं घ्यायचं, याबाबत मला वारंवार सल्ले दिलेत. या सगळ्याच कलाकारांनी मला नेमका अभिनय कसा करायचा, हे शिकवलं. परदेशात हा माझा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळं थोडी भीती वाटायची. मात्र, सगळे सोबत असल्यानं मजा आली, असं श्रीनिवास बिनधास्त म्हणाला.
- अशी आहे श्रीनिवासची भूमिका - छूमंतर या चित्रपटात सूव्रत जोशी आणि प्रार्थना बेहेरे हे माझ्या आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात माझ्या वडिलांची बदली परदेशात लंडनमध्ये होते. आम्ही लंडनला जातो. मात्र, माझी ओढ ही आपल्या देशात आपल्या मित्रांना भेटण्याची असते. यासाठीची माझी धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली, असं श्रीनिवास सांगतो.
चित्रपटाला प्रतिसाद नाही- खरंतर छुमंतर हा चित्रपट अतिशय दर्जेदार आणि उत्तम होता. सगळ्यांच्याच भूमिका उत्तम आहेत. असं असलं तरी हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला नसल्यानं त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत व्यक्त अभिनेता पोकळेनं व्यक्त केली. या चित्रपटातील माझ्या भूमिकेची दखल घेण्यात आली. पुरस्कारासाठी प्राधान्यानं विचार करण्यात आला. याचा खरंच आनंद होतो, असं श्रीनिवास म्हणाला.
आता फक्त परीक्षा- नाळ आणि नाळ दोन या दोन चित्रपटांसह छूमंतर हा चित्रपट केला असताना यावर्षी मात्र दहावीची परीक्षा आहे. त्यामुळे चित्रपटांपासून थोडं लांब राहात केवळ परीक्षेवरच लक्ष केंद्रित केलं असल्याचं श्रीनिवास म्हणाला. परीक्षा जवळ आली असताना परीक्षेचं थोडं टेन्शन वाढलं. अशातच पुन्हा एक नवा पुरस्कार घोषित झाल्याचं कळताच आनंद होतो आहे, असं श्रीनिवास म्हणाला.
राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित- 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ चित्रपटातील चैत्याच्या भूमिकेसाठी श्रीनिवास पोकळे याला 23 डिसेंबर 2019 रोजी देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
हेही वाचा-