आग्रा :पिझ्झा पार्टीच्या आमिषानं कॅब चालकानं एका बालिकेला हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना ताजनगरी आग्रा इथं उघडकीस आली आहे. या नराधमानं पीडित बालिकेला तीन तास ओलीस ठेवलं, ही घटना कोणाला सांगितली, तर ठार मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे हादरलेल्या पीडितेला जोरदार धक्का बसला. नराधम कॅब चालक बालिकेला बलात्कारानंतर घराजवळ सोडून पळून गेला. मात्र पीडितेनं ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानं त्यांनी तत्काळ ताजगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय चाचणी करुन नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. बालिकेवर बलात्कार करण्यात आलेली हॉटेलही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सौरव सिंग असं नराधम कॅब चालकाचं नाव आहे.
बालिका बेपत्ता झाल्यानं उडाली खळबळ :बुधवारी संध्याकाळी ताजगंज पोलीस ठाण्याच्या परिसरातील 14 वर्षीय बालिका बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली. त्यानंतर ही बालिका तब्बल तीन तासानं घरी पोहोचली. मात्र घरी आल्यानंतर ही बालिका हादरलेली होती. तिची अवस्था पाहून कुटुंबातील सदस्य काळजीत पडले. ती बराच वेळ तिच्या कुटुंबाला असंबद्ध गोष्टी सांगत राहिली, पण जेव्हा कुटुंबानं तिला खूप विचारलं तेव्हा तिनं संपूर्ण आपबिती कथन केली.
पिझ्झा पार्टीच्या बहाण्यानं नराधमानं नेलं हॉटेलमध्ये : पीडित बालिकेला कुटुंबीयांनी विश्वासात घेऊन विचारलं असता, तिनं दिलेल्या धक्कादायक माहितीनं कुटुंबीयांनाही हादरा बसला. पीडित बालिकेनं सांगितलं, की "एकता चौकी परिसरातील कॅब ड्रायव्हर सौरव सिंग मला वाटेत भेटला. पिझ्झा पार्टीच्या बहाण्यानं त्यानं ताजनगरी फेज-2 मधील हॉटेल डॅझलमध्ये घेऊन गेला. हॉटेलमध्ये त्यानं बलात्कार केला, इतकंच नाहीतर त्यानं तब्बल तीन तास ओलीस ठेऊन अत्याचार केला. घटनेबद्दल कोणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, तो घराजवळ सोडून पळून गेला," अशी माहिती बालिकेनं दिली.