नवी दिल्ली AAP Leader Atishi Hospitalized :राजधानी दिल्लीला हक्काचं पाणी मिळावं म्हणून जल सत्याग्रहावर बसलेल्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती मंगळवारी सकाळी खालावली. त्यानंतर मंत्री आतिशी यांना लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात ( LNJP ) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपोषणाच्या चौथ्या दिवशी सोमवारी लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयातील डॉक्टरांनी मंत्री आतिशीच्या प्रकृतीची तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी मंत्री आतिशी यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी सोमवारी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. आज सकाळी मंत्री आतिशी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मंत्री आतिशी यांना केलं रुग्णालयात दाखल :दिल्लीला पाणी मिळावं यासाठी मंत्री आतिशी यांनी अनिश्चित काळासाठी भोगल इथं जल सत्याग्रह सुरू केला आहे. मात्र सोमवारी रात्री त्यांची शुगर लेव्हल खालावली. आतिशी यांची शुगर लेव्हल सोमवारी रात्री 43 आणि मंगळवारी पहाटे 3 वाजता 36 पर्यंत खाली घसरली. मंत्री आतिशी मागील पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यामुळे काहीही न खाल्ल्यामुळे मंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली आहे. हरियाणाकडून दिल्लीच्या वाट्याचं पाणी सोडावं या मागणीसाठी मंत्री आतिशी यांनी 21 जूनपासून उपोषण सुरू केलं. उपोषणाच्या चार दिवसात मंत्री आतिशी यांचं वजन 2.2 किलोनं कमी झालं.