कोयना धरणातून वाढवला विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Koyna Dam Satara - KOYNA DAM SATARA
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 26, 2024, 7:39 AM IST
सातारा Koyna Dam Satara : कोयना धरणातून गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ११,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामध्ये सायंकाळी आणखी १०,००० क्युसेकनं वाढ करण्यात आली आहे. धरणाचा सांडवा आणि पायथा वीजगृहातून एकूण २१,०५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. दिवसभर कोयनानगर इथं ९० मिलीमीटर, नवजा इथं ७० आणि महाबळेश्वर इथं ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आवक वाढल्यास विसर्गात आणखी वाढ केली जाणार आहे. गुरेघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार असल्यानं गोकुळ तर्फे पाटणकडं जाणाऱ्या जुन्या पुलावर पाणी आलं आहे. या पुलावरुन गोकुळ तर्फ पाटण, आंबेघर, काहीर परिसरात जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार आनंद गुरव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. खबरदारी म्हणून पुलाच्या दोन्ही बाजुला पोलीस तैनात करण्यात आले आहेत.