"थोरात यांची इच्छा असेल तर...", विधानसभा निवडणुकीवरुन सुजय विखे पाटील, बाळासाहेब थोरात आमने-सामने - Sujay Vikhe Vs Balasabeb Thorat - SUJAY VIKHE VS BALASABEB THORAT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 2, 2024, 4:59 PM IST
संगमनेर Sujay Vikhe On Balasabeb Thorat : माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भाजपाकडून संगमनेर आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार करण्याची इच्छा व्यक्त केलीय. विखे पाटलांच्या या भूमिकेमुळं संगमनेरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि राहुरीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर आव्हान उभं राहिलंय. तर सुजय विखे पाटलांच्या या भूमिकेवरुन टीका करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, "मोठ्याचं लाडकं लेकरू आहे. पक्षानं नाही तर पालकानं त्याचा हट्ट पुरवावा. ते एकाच ठिकाणी नाही तर दोन्ही ठिकाणी उभं राहू शकतात. त्यामुळं निदान बालकाचा हट्ट तरी पूर्ण होईल", अशी बोचरी टीका थोरातांनी विखे पिता-पुत्रावर केली. तर आज (2 ऑगस्ट) संगमनेर मधील कार्यकर्ता बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुजय विखे पाटलांनी थोरातांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलं. ते म्हणाले, "बाळासाहेब थोरातांची फार इच्छा असेल तर त्यांनी सांगितलेलं मी माझ्या वडिलांच्या कानावर घालतो. विषय हट्टाचा नाही तर संघटनेसाठी त्यागाचा आहे. मी फक्त सुतोवाच केले होते की जर संगमनेर राहुरी मतदार संघात उमेदवारावर एकमत होत नसेल तर मी आहे. आमची इच्छा आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. मी थोरातांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आणि काय बोलले ते ऐकत नाही."