चित्तथरारक कुणकेरीचा हुडोत्सव उत्साहात; हजारोंच्या उपस्थितीत 100 फुटी हुड्यावर अवसार स्वार - Kunkeri Hudotsav
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 31, 2024, 12:51 PM IST
सिंधुदुर्ग Kunkeri Hudotsav : जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. 100 फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेनं दगडांचा मारा केला. यावेळी हजारो भाविकांनी 'याची देही याची डोळा' या चित्तथरारक उत्सवाची अनुभूती घेतली. रोंबाट, वाघ शिकार, घोडेमोडनी हे विशेष आकर्षण ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत हुडोत्सव उत्साहात पार पडला. कोकणातील शिमगोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा हुडोत्सव सावंतवाडी तालुक्यास जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच असतो. कुणकेरीतील शिमग्याच्या सातव्या दिवशी होणारा हुडोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध व मानाचा असतो. आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल, कोलगावचा श्री देव कलेश्वर यांनी बहीण श्री देवी भावईच दर्शन यावेळी घेतलं जातं. तिन्ही गावांच्या सीमेवर ही भावा-बहिणींची भेट झाली की त्यानंतर आंबेगाव, कोलगाव, कुणकेरी गावाची निशाण हुड्याच्या ठिकाणी दाखल होतात. यावेळी तीन अवसार कौल घेतल्यानंतर श्रींचा पालखीसह गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एकामागोमाग एक अवसार चढतात. यावेळी हूडोत्सवासाठी जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसारावर दगड मारण्यात येतात. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या हुडोत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक कुणकेरी गावात उपस्थित राहतात. सायंकाळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.