मनसे कामगार सेना जिल्हा प्रमुखावर गोळीबार; हल्लेखोरानं झाडल्या दोन गोळ्या, या अगोदर भावावर झाला होता हल्ला - Firing On MNS Leader - FIRING ON MNS LEADER
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 5, 2024, 11:07 AM IST
चंद्रपूर Firing On MNS Leader : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेलच्या जिल्हा प्रमुखांवर अज्ञात हल्लेखोरानं गोळीबार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना चंद्रपूर शहरातील मध्यभागात असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स इंथं गुरुवारी घडली. अमन अंडेवार असं गोळीबार करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा प्रमुखाचं नाव आहे. यात अमन अंडेवार हे गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार अमन अंडेवार हे मनसे कामगार सेलचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांचं रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये तिसऱ्या माळ्यावर कार्यालय आहे. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास अंडेवार हे आपल्या कार्यालयात जात होते. ते लिफ्ट उघडण्याची वाट बघत असतानाच मागून एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर पिस्तुलातून फायरिंग केली. दोन वेळा ही फायरिंग करण्यात आली. यापैकी एक गोळी ही अंडेवार यांच्या पाठीत घुसली. त्यांना प्राथमिक उपचार करुन नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचलं. येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपीचा कसोशीनं शोध घेतला जात आहे. मात्र वृत्त लिहेपर्यंत अद्याप आरोपीला अटक झाली नाही. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी 12 जुलै 2021 ला याच कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार करण्यात आला होता. हा गोळीबार अमन अंडेवार यांच्या लहान भावावर करण्यात आला होता. बल्लारपूर येथील कोळसा व्यावसायिक सुरज बहुरीया या व्यक्तीची सुनियोजित पद्धतीनं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यात आरोपी म्हणून आनंद अंडेवार याला अटक देखील झाली. यानंतर त्यांचा भाऊ याच्यावर देखील गोळीबार झाला. सध्याचा गोळीबार हा त्याच करणातून झाला काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.