नवी दिल्ली new semiconductor unit : गुजरातमधील साणंदमध्ये नवीन सेमीकंडक्टर युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. मोदी मंत्रिमंडळानं यासाठी केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार, प्रस्तावित युनिटची स्थापना 3,300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनं केली जाईल. या युनिटमध्ये दररोज 60 लाख चिप्स तयार करण्याची क्षमता असेल.
60 लाख चिप्स तयार होणार : भारत सेमीकंडक्टर मिशन (ISM) अंतर्गत प्रस्तावित युनिट दररोज सुमारे 60 लाख चिप्स तयार करेल. या युनिटमध्ये उत्पादित चिप्स औद्योगिक, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक वाहनं, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि मोबाइल फोन इत्यादी विभागांसह विविध अनुप्रयोगांची पूर्तता करतील. देशात प्रत्येक उपकरणासाठी 'मेड इन इंडिया' चिप्स विकसित करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे. स्वदेशी बनावटीची पहिली चिप या वर्षाच्या अखेरीस देशात येणार आहे, असं मोदींनी म्हटलंय.
तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी : टाटा इलेक्ट्रॉनिक्स गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅब आणि मोरीगाव, आसाम येथे सेमीकंडक्टर युनिटची स्थापना करत आहे. सीजी पॉवर हे सेमीकंडक्टर युनिट साणंदमध्ये उभारत आहे. या युनिट्समुळं लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या मते, चारही सेमीकंडक्टर युनिट्सचं बांधकाम वेगानं सुरू आहे. “या चार युनिट्समध्ये अंदाजे 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. या युनिट्सची एकत्रित क्षमता दररोज सुमारे 7 कोटी चिप्स आहे,”असं मंत्रालयाचा दावा आहे.
भारत सेमीकंडक्टर हबपैकी बनेल : भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठी 2021 मध्ये एकूण 76,000 कोटी रुपयांच्या खर्चासह कार्यक्रम अधिसूचित करण्यात आला. अहवालानुसार, भारताची अर्धसंवाहक-संबंधित बाजारपेठ 2026 मध्ये $64 अब्जपर्यंत पोहोचेल. केंद्रीय रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच सांगितलं की, येत्या पाच वर्षांत देश जगातील सर्वात मोठ्या सेमीकंडक्टर हबपैकी एक बनेल.
'हे' वाचलंत का :