बुलडाणा ZP School Teacher Abused Girls : चौथीत शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींवर जिल्हा परिषदेच्या शिक्षकानंच लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. खुशाल उगले असं त्या नराधम शिक्षकाचं नाव आहे. या नराधम शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नराधम शिक्षक खुशाल उगले याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार : जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा त्यांच्या शाळेतील शिक्षक खुशाल उगले हा लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना सांगितला. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. विद्यार्थिनींनी लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार पालकांना कळवताच संतप्त नागरिकांनी शाळेत धाव घेतली. या नागरिकांनी किनगाव राजा पोलीस ठाणे गाठत या नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
पोलिसांनी नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या : जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी प्रचंड राडा केला. या नराधम शिक्षकाला तत्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली. शाळेतील शिक्षक असलेल्या खुशाल उगले यानं या विद्यार्थिनीला शिकवण्याच्या बहाण्यानं धमकावून या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती नागरिकांनी यावेळी पोलिसांना दिली. दरम्यान किनगाव राजा पोलिसांनी पीडित बालिकेच्या तक्रारीवरुन आरोपी नराधाम शिक्षक खुशाल उगले विरोधात विनयभंग, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे, अशी माहिती ठाणेदार विनोद नरवाडे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- धक्कादायक! शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल - Rape Of Minor Girl
- कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER
- 'तू मला आवडतेस...'; स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला इंस्टा मेसेज, मनसैनिकांनी फुल्ल धुतला - School Van Driver Message Girl