ठाणे Youth Murder Case Thane : २८ वर्षीय तरुणाची भर रस्त्यात डोळ्यात मिरची स्प्रे मारून चार ते पाच जणांच्या गुंडांच्या टोळीनं निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ३ च्या फार्व्हर लाईन भागात असलेल्या इमली पाडा परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या झालेल्या तरुणाची दुचाकी जाळल्यानं त्यानं मुख्य आरोपी असलेल्या गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हाच गुन्हा मागे घेण्याच्या वादातून त्या तरुणाची भर रस्त्यात त्याच्या आई समोरच हत्या केली गेली.
'हे' आहे गुंडाचं नाव : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकणी आणि त्याचे चार साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या गुंडांची नावं आहेत. तर राहुल जैस्वाल (वय २८) असं निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
गुन्हा मागे घेण्यासाठी राहुलवर दबाव : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या फार्व्हर लाईन परिसरातील इमली पाडा भागात मृत राहुल कुटुंबासह राहत होता. तर याच इमली पाडा परिसरात राहणारा सराईत मुख्य आरोपी बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकणी त्याच्या दोन साथीदारांनी 2022 साली मृत राहुलची दुचाकी जाळली होती. त्यावेळी मृत राहुलनं मुख्य आरोपी बाबू ढकणी विरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर बाबू ढकणी हा जेलमधून जामिनावर सुटला होता. त्यामुळे मृत राहुल आणि बाबू यांच्यात शत्रुत्व वाढलं होतं. दुचाकी जाळल्याचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी मुख्य आरोपी बाबू ढकनी हा दबाव आणत होता; मात्र दाखल गुन्हा मागे घेण्यास मृतक राहुल नकार देत होता.
राहुलवर जीवघेणा हल्ला : याच वादातून ८ फेब्रुवारी (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास मृत राहुल जैस्वाल याच्या घरावर आरोपी बाबू ढकणी, करण ढकणी आणि इतर चार ते पाच साथीदारांनी दगडफेक करून हल्ला केला. या हल्ल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी राहुल आणि त्याची आई फार्व्हर लाईन चौकात पोहोचले. यावेळी बाबू ढकणी यानं त्याच्या साथीदारांसह मिळून राहुलवर हल्ला करत त्याला ठार मारलं. ह्या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
तपासासाठी पोलीस पथक तयार : ह्या घटनेनंतर फार्व्हर लाईन परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. ह्या घटनेनंतर सहाय्यक पोलीस उपायुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन पोलीस पथकं तयार केली. अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिली आहे.
हेही वाचा: