मुंबई Mumbai Cyber Crime : कांदिवली परिसरात एका तरुणीची सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) लाखोंची फसवणूक केली आहे. भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात अडकल्याची बातावणी करत तरुणीला १.९५ लाखांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी आदिनाथ सायबर गुन्हेगारांविरोधात भारतीय दंड संविधान कलम 34, 419, 420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क आणि 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पुष्पक इंगळे हे या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.
काय आहे प्रकरण : कांदिवली पूर्वेकडील ठाकुर व्हीलेजमध्ये कुटुंबासोबत राहात असलेली २५ वर्षीय तक्रारदार तरुणी खासगी कंपनीत नोकरी करते. ६ जानेवारीच्या दुपारी तरुणीच्या मोबाईलवर एका अनोळखी व्हॉटसअँप नंबरवरुन कॉल आला. तक्रारदार तरुणीच्या वडिलांनी हा कॉल उचलला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीनं तुमचा मुलगा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकला असून तो रडत असल्याचं सांगितलं.
एक लाख ९५ हजार रुपये उकळले : कॉल करणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याच्या बाजूला एक मुलगा रडत होता. त्याचा आवाज आपल्या मुलासारखा येत असल्यानं तक्रारदार तरुणीचे वडील घाबरले. त्यांनी फोन तरुणीकडं दिला. पुढे त्या तोतया पोलीस अधिकाऱ्यानं तरुणीला तिच्या भावाचे बलात्काराच्या गुन्ह्यातून नाव कमी करण्याच्या बहाण्यानं एकूण एक लाख ९५ हजार रुपये उकळले. ते पोलीस अधिकारी भावाशी बोलणं करुन देत नसल्यानं पूजाला संशय आला.
फसवणूकीची केली तक्रार : तिने आपल्याकडं आणखी रक्कम नसल्याचं सांगितल्यानं त्यांनी एका तरुणाशी तरुणीचं बोलणं करुन दिलं. मात्र, त्याचा आवाज आपल्या भावासारखा नसल्यानं आपली फसवणूक होत असल्याची तरुणीला खात्री पटली. अखेर तिनं सायबर हेल्पलाईन आणि समता नगर पोलीस ठाणे गाठून फसवणूकीची तक्रार दिली आहे.
हेही वाचा -