अमरावती Holi Festival 2024 : उन्हाच्या कडाक्यानं जंगलात पानगळ होऊन रानं उजाड झाली आहेत. मात्र या उजाडलेल्या रानात पळस फुलानं निसर्गावर लाली चढवली आहे. एखाद्या तपस्वीसारखा पळस रानोमाळ बहरला. अमरावती जिल्ह्यात मेळघाट आणि पोरा या जंगलात विविध रंगी फुलांच्या वृक्षासह केशरी आणि पिवळ्या रंगाचा पळस अनेकांचं लक्ष वेधून घेतो. जिकडं तिकडं रंगपंचमीचा उत्सव साजरा होत आहे. जंगलात पळसाच्या केशरी आणि पिवळ्या रंगाच्या फुलांची उधळण म्हणजे निसर्गाची खास रंगपंचमीच असल्याचा अनुभव सध्या माळरानावर येत आहे.
नैसर्गिक रंगांसाठी होतो वापर : मेळघाटातील आदिवासी बांधव तसंच अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पळसाच्या फुलांचा नैसर्गिक रंग तयार करून होळीला तो एकमेकांना लावला जातो. पळसाची फुलं तोडून ती पाण्यात टाकल्यावर लाल रंग तयार होतो. रंगपंचमीला या नैसर्गिक लाल रंगाचं पाणी एकमेकांवर फेकलं जातं. पिवळ्या रंगाच्या पळसाच्या फुलांचं पाणी देखील गडद पिवळ्या रंगाचं होतं. पळसाच्या फुलांना सुकवून त्यांचा रंग देखील तयार केला जातो. आदिवासी बांधव रासायनिक रंगांच्या ऐवजी पारंपरिक पद्धतीनं पळसाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेला नैसर्गिक रंगच रंगपंचमीला उधळतात.
पळसाच्या फुलांनी कमी होते उष्णता : "उन्हाळ्यात माणसांच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पळसाची फुलं ही अतिशय गुणकारी आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पहाटे तोडून आणलेली पळसाची पानं पाण्यात भिजवून ठेवली जातात. तासाभरानं या पाण्यात खडीसाखर किंवा गूळ टाकून हे पाणी पिलं जातं. पळसाच्या या पाण्यामुळे उन्हाळी किंवा उष्णतेच्या इतर विकारापासून माणसाचा बचाव होतो," असा दावा निसर्ग अभ्यासक प्रदीप हिरुळकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.
पोहरा जंगलात दुर्मीळ पिवळा पळस : केशरी, पिवळा आणि पांढरा असे तीन प्रकारचे रंग असणारे पळस आहेत. पांढरा पळस हा अतिशय दुर्मीळ आहे. विदर्भात केशरी रंगाची फुलं असणारा पळस सर्वत्र आढळतो. केशरी रंगाच्या फुलासोबतच काही ठिकाणी अतिशय दुर्मीळ असा पिवळा पळस देखील बहरलेला दिसतो. अमरावती शहरालगत पोहरा जंगलात पहाडावर पिवळा पळस बहरला आहे. "अतिशय दुर्मीळ असणारा पिवळा पळस पोहरा जंगलासह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामागं असणाऱ्या मार्डी मार्गावर देखील अनेक वर्ष उन्हाळ्यात आढळत होता. यावर्षी मात्र या भागातील पळस दिसेनासा झाला आहे. पोहरा जंगलातील पहाडावरचा पळस देखील काही जाणकारांना ठाऊक आहे. पोहरा जंगलातील हा पिवळा पळस अतिशय सुंदर आहे," असं निसर्ग मित्र दिगंबर नेमाडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
पिवळ्या पळसाचं वैशिष्ट्य : "वीस मीटरपर्यंत उंच वाढणाऱ्या पिवळ्या पळसामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पिवळ्या पळसाची साल ही अल्सर या आजारावर गुणकारी आहे. यासह इतर पोटाच्या विकारावर देखील पिवळा पळस महत्वपूर्ण औषधी आहे. पिवळ्या पळसाच्या रंगाचा वापर कपड्यांसाठी देखील केला जातो," अशी माहिती दिगंबर नेमाडे यांनी दिली. "पिवळ्या पळसाच्या संवर्धनासाठी या झाडाच्या बिया आम्ही गोळा करून हे वृक्ष इतरत्र वाढावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे," असं देखील दिगंबर नेमाडे म्हणाले.
हेही वाचा :