सातारा : राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात राज्यात मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटपाचं जवळपास निश्चित झालंय. या निवडणुकीत पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना त्यांचं मूळगाव असलेल्या दरे या गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
महिलांनी केलं औक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी रात्री उशिरा दरे या त्यांच्या मूळगावी आले होते. शुक्रवारी ते पुन्हा मुंबईकडं रवाना झाले. शिंदे यांचा ताफा हेलिपॅडकडं निघणार होता. त्यावेळी गावातील महिलांनी शिंदे यांचा ताफा थांबवून त्यांचं औक्षण केलं. "आमचा विकास केला असून, आता निवडणुकीत तुमचा विकास होईल व पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री होणार," असे आशीर्वाद महिलांनी दिले.
महिलांशी संवाद साधला : "राजकारणाच्या धकाधकीतून वेळ काढत काही क्षण निवांत घालवण्यासाठी दरे गावात गेलो होतो. गावाहून निघत असताना काही महिलांनी माझा ताफा थांबवला. माझ्याच गावात राहणाऱ्या या माय माऊलींचे माझ्या आईशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पण, मी त्यांना ओळखेन की नाही अशी शंका त्यांना क्षणभर जाणवली, मात्र मी या सर्व माय माऊलींना ओळखलं," असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या महिलांशी संवाद साधला.
![CM EKNATH SHINDE DARE VILLAGE](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-10-2024/22715760_eknath-shinde.jpg)
पुन्हा एकदा आपलं सरकार यायला हवं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महिलांना 'लाडकी बहीण योजने'चे पैसे मिळाले की नाही असं विचारलं असता, सर्व महिलांनी होकारार्थी माना हलवत आपलं उत्तर दिलं. तसंच राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार यायला हवं, असं या महिलांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं.
![CM EKNATH SHINDE DARE VILLAGE](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-10-2024/22715760_eknath-shinde123.jpg)
हेही वाचा