नाशिक woman gives birth on bus : सोनोग्राफी करण्यासाठी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला वेदना सुरू झाल्यामुळं बस थांबवून बसमध्येच प्रसूती करावी लागलीय. शेतातील महिला मदतीला धावून आल्यानं माता आणि बालक सुखरूप आहेत. ते सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बाळासह आई सुखरूप : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील अंबाडा गावातील अनिता मनोज चोथवा ही महिला सुरगाणा-नाशिक बसमधून 13 जुलै रोजी दुपारी वणी येथील रुग्णालयात सोनोग्राफीसाठी जात होती. प्रवासात असताना महिलेस प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशावेळी रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्यात आला. मात्र, रुग्णवाहिका येण्यासाठी काही वेळ जाणार होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरगाणा शहरापासून पाच ते सहा किलोमीटरवरील जामुनमाथा फाट्यावर बस थांबविण्यात आली. तिथंच महिलेची प्रसुती करण्यात आली. त्यानंतर महिलेला रुग्णवाहिकेतून जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर नाळ कापण्यासाठी काही साहित्य नव्हतं. त्यामुळं नाळ तशीच ठेवून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान सरपंच काशीनाथ गवळी, चालक अरुण लोकनार, वाहक रोहिदास खैरनार, वसंत गवळी तसंच ग्रामस्थांनी सहकार्य केलं.
महिला देवदूतासारख्या आल्या धावून : " सोनोग्राफी करण्यासाठी वणी तेथील रुग्णालयात बसनं जात असतांना रस्त्यात मला प्रसूती वेदना सुरू झाल्या. या वेदना असह्य होत होत्या. याची माहिती मी बसमधील सहप्रवाशी महिलांना दिली. त्यानंतर बस ड्रायव्हरला याची कल्पना दिली. त्यांनी बस बाजूला थांबवली. त्यानंतर शेतातील महिलांनी मला धीर देत माझी प्रसूती केली. वेळीच देवदूतासारख्या महिला धावून आल्या. त्यामुळे मी सुखरूप मुलाला जन्म देऊ शकले," असं अनिता चोथवा यांनी सांगितलं.