मुंबई - Sanjay Raut question to Mohan Bhagwat : लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपावर निशाणा साधत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांनी फक्त लिहून आणि बोलून काही होणार नसून ते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कारवाई करणार का? असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे. ते मुंबईत बोलत होते.
हिंमत असेल तर यांच्यावर कारवाई करा...
याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आरएसएस भाजपाची मातृसंस्था असून आरएसएसने भाजपाला मोठं करण्याबरोबर एक नैतिक ताकदही दिली आहे. परंतु मागील दहा वर्षांमध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आरएसएसला संपवण्याचं काम केलं आहे. अजित पवारांपासून अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे या सर्व भ्रष्टाचारी लोकांना बीजेपी जेलमध्ये टाकणार होती. पण आता त्यांनी, त्यांना आपल्या पक्षात घेऊन ते महाराष्ट्राच्या वरती कब्जा करू पाहात आहेत. परंतु लोकांनी त्यांना साफ नाकारलं आहे. ७० हजार कोटींचा अजित पवार यांचा सिंचन घोटाळा, तसंच अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा. किरीट सोमैया यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे या सर्वांना भाजपानं त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुतलं आणि ते स्वच्छ झाले.
आता मोहन भागवत म्हणत आहेत, याला घ्यायला नको होतं, त्याला घ्यायला नको होतं. पण भाजपाने त्यांना पक्षात घेतलं, तुम्ही काय केलं? लोकसेवकाला अहंकार असता कामा नये, असं तुम्ही म्हणता. परंतु मोदी आणि शाह यांनी अहंकाराच्या सर्व मर्यादा तोडल्या आहेत. जर तुमच्यात हिंमत असेल तर यांच्यावर कारवाई करत, यांच्या विरोधात बंड कराल का? फक्त गोष्टी लिहून आणि सांगून होत नाही तर त्यासाठी ॲक्शन घ्यायची गरज असते, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
आरएसएस सुनेत्रा पवारांना विरोध करणार का?
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात येत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. परंतु सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मतं कमी आहेत. परंतु भाजपाच्या पाठिंब्यानं ते त्यांना राज्यसभेवर पाठवतील. मग अशा परिस्थितीमध्ये आरएसएस यासाठी विरोध करेल का? असा थेट प्रश्नही संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना विचारला आहे.
वंदना सूर्यवंशी सर्वात भ्रष्ट अधिकारी
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे रवींद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतानं विजय झाला. शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तिकर यांना हार पत्करावी लागली. या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, या मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखातर रवींद्र वायकर यांना विजयी केलं आहे. वंदना सूर्यवंशी या आतापर्यंतच्या सर्वात भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. वंदना सूर्यवंशी यांचा संपूर्ण इतिहास माझ्याकडे आला आहे. मतमोजणी केंद्रावर रवींद्र वायकर यांचे नातेवाईक, मित्रपरिवार मोबाईल घेऊन आतमध्ये कसे आले. त्यांना का रोखलं गेलं नाही. या केंद्रातील सर्व सीसीटीव्ही फुटेज वंदना सूर्यवंशी यांनी द्यायला हवेत. ही चोरी त्यांना पचणार नसून त्यांना जुलाब होतील. या संदर्भात आम्ही कोर्टात जाणार आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय होईल असंही राऊत म्हणाले.
हेही वाचा -