मुंबई Strange Names : जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपियर लिहून गेला व्हॉट्स इन ए नेम.... नावात काय आहे... पण नावाची महती त्याला काय माहीत असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण जगाच्या पाठीवर अनेक भागात नावात काय-काय आणि कशा प्रकारचे अर्थ भरले असतील ते कदाचित शेक्सपियरला माहीत नसावं....तुम्ही विचाराल आज हे सांगण्याचं कारण काय? आपल्याकडे भारदस्त नावं दिली जातात त्यामध्ये संत-महात्मे, राजा-महाराजांची, युगपुरुषांची, राष्ट्र पुरुषांची नावं ठेवली जातात. तसंच नकुशी, दगडू, धोंडू, भिकाजी, बंदुक्या, पिस्तुल्या अशीही नावं ठेवली जातात. या नावांच्यामागे खूप काही वैशिष्ट्ये दडलेली आहेत.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात 'नकुशी' हे नाव अनेक ठिकाणी ठेवण्यात येतं. त्यामागे महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा एखाद्या घरी दुसरी-तिसरी मुलगी झाली की तिचं नाव नकुशी ठेवण्याची प्रथा आहे. कारण प्रत्येकाला घरी वंशाचा दिवा हवा असतो. जेव्हा एक-दोन मुली झाल्यावर दुसरी-तिसरी मुलगी होते. त्यावेळी तिच्या आईवडिलांनाच ती नकोशी असते. त्यामुळे अशा मुलींना नकोशी म्हणण्याची वेळ येते. एवढंच नाही तर काही मुलींची पाळण्यात नावंही तशीच ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागात घडल्याचं दिसून येतं. पाळण्यात चांगली नावं जरी ठेवली असली तरी त्यांना नकोशी म्हणत असत.
पालकांना समजावून सांगून काही सामाजिक संस्थांनी अशा नकुशी नावाच्या मुलींची नावं बदलल्याचंही दिसून येतं. नुसतीच नावं त्यांनी बदलली नाहीत, तर त्यांचं रेकॉर्डवरील नावही या सांस्थांनी बदलून या नकुशांना सन्मानानं जगण्याचा अवकाश मिळवून दिल्याचीही उदारणं आहेत. या प्रकारच्या नकोशा झालेल्या मुलांच्या व्यथाही काही ठिकाणी मराठी साहित्यामधून वाचायला मिळते. अनेक नकोशींच्या आयुष्यामध्ये त्यांनी नंतर कर्तबगारी दाखवून नावारुपाला आल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. नकुशी या नावाची एक टीव्ही सिरियलही आली होती. ती याच विषयाला वाहिलेली कर्तबगार मुलीची कथा सांगणारी सिरीयल होती.
सर्वसाधारणपणे कुणीही धोंड्या, दगड्या, दगडोबा, धोंडीबा, भिकाजी अशी नावं ठेवत नाही. पण अशी नावही महाराष्ट्रात पाहायला ऐकायला मिळतात. त्यामागे कारण काय असावं याचा शोध घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला. त्यावेळी असं लक्षात आलं की काही ठिकाणी नवस म्हणून अशी नावं ठेवली जातात. तर आणखी एक रंजक किंवा खरं तर करुण, भीतीदायक कारण अशी नावं ठेवण्यामागं असल्याचं दिसलं.
यातील धोंडीबा, दगडोबा ही नावं ठेवण्यामागची कारणं पाहिली तर मुलांच्या मृत्यूंच्यामधून अशी नावं ठेवल्याचं लक्षात आलं. आम्ही असंच धोंडीबा नाव असलेल्या एका आजोबांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नावाची रंजक कथाच सांगितली. ते म्हणाले की, त्यांच्या आईला एकूण १३ मुलं. त्यात दोन मुली आणि १२ मुलं होती. त्यातील हे आजोबा आणि दोन बहिणी जगल्या, ११ मुलांचा मृत्यू झाला. त्यांच्या आई-वडिलांनी 'दगडा धोंड्यासारखा का होईना हा मुलगा जगू दे' म्हणून त्यांचं नाव धोंडीबा ठेवलं. आईवडिलांनी श्रद्धेनं त्यांना सांभाळलं. आज हे आजोबा सत्तरी पार केलेले आहेत. मात्र त्या काळातील बालमृत्यूचं कटू सत्य त्यांच्या या कथनातून समोर येतं. यातूनच दगडू-धोंडीबा अशी नावं ठेवण्याची त्या काळात पद्धत होती हे दिसून येतं. अशीच पद्धत आजही ग्रामीण भागात पाहायला मिळते.
भिकाजी हे असंच नाव. जास्ती मुलं होणाऱ्यांची मुलं जगावीत म्हणून जशी नावं ठेवत, तसंच मूल होत नसलेल्यांनी देवाला जणू भिक मागून नवसा-सायासानं मूल जन्म जन्माला आलं म्हणून त्याचं नाव भिकाजी ठेवण्याची प्रथा होती असंही दिसून आलं. त्याचबरोबर प्रसाद, देवीप्रसाद, अंबाप्रसाद, द्वारकाप्रसाद अशी नावंही त्या-त्या देवांनीच ही आपत्य पदरात टाकली अशा भावनेतून ठेवलेली दिसून येतात.
याचबरोबर काही भन्नाट नावंही महाराष्ट्रात दिसून येतात. यामध्ये बंदुक्या, पिस्तुल्या, काडतुस्या, वकील्या, मॅजेस्ट्रेट अशा नावांचा समावेश करता येईल. मराठवाडा खान्देशाच्या काही भागात अशी नावं विशिष्ठ समाजातील लोकांच्या मुलांना दिलेली दिसून येतात. पारधी समाजातील मुलांची सर्वसाधारणपणे अशी नावं ठेवलेली दिसून येतात. परंपरेचा पगडा आणि जीवनात आलेले कटू अनुभव यातून अशी नावे ठेवली जात असल्याचं यासंदर्भात संशोधन करणाऱ्यांनी लिहून ठेवल्यांचं दिसून येतं.
आज जर शेक्सपियर हे वाचायला जिवंत असता तर नक्कीच नावाची ही रंजक आणि सत्य माहिती वाचून त्यालाही वाटलं असतं नावात दम आहे बॉस. शेक्सपियरनंही त्याचे शब्द हे वाचून नक्कीच मागे घेतले असते.
हेही वाचा -