मुंबई Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेला पुतळा पाहायला मिळतोय हे अतिशय दुर्दैवी आहे. जेव्हा पानशेत प्रलय झाला होता. उस्मानाबादमध्ये भूकंप घडला होता. यानंतर जी भीषणता महाराष्ट्रात निर्माण झाली होती. ज्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सध्या प्रतिक्रिया उमटताहेत. यावेळी पहिली प्रतिक्रिया ही आमचे आमदार वैभव नाईक यांची आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून, याचे पहिल्यांदा पडसाद उमटले होते, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणालेत. आज (शुक्रवारी) मालवणमधील राजकोट येथे महाराजांचा पुतळा पडला. त्या जागेची पाहणी केली यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
जनाची नाही, मनाची लाज... - या सरकारच्या विरोधात आणि पुतळा पडला त्याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीचं मुंबईत मोठं आंदोलन होत आहे. हे जोडे मारो आंदोलन आहे. सरकारची तीच लायकी आहे. एवढं होऊन सुद्धा हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. कारण त्या गुन्हेगारांसोबत यांचे आर्थिक हितसंबंध आहेत. आपापल्या माणसांना ठेकेदारांना या पुतळ्याचं काम देऊन त्यांच्याकडून कमिशन घेतलं गेलं आहे. ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण या सरकारने सोडलं नाही. पुतळा पडल्यानंतर हे सरकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एवढे खोटे बोलतात की, पुतळा वाऱ्याने पडला असं म्हणतात. त्यांना जनाची आणि मनाची देखील लाज नाही, असा हल्लाबोल राऊतांनी सरकारवर केला.
स्वतःचे पाप नौदलावर ढकलताय... - पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमचे महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी पुतळ्याची पाहणी करून गेले. तुम्ही सर्व माध्यमकर्मी इथे आहात, तुमचे मोबाईल किंवा कॅमेरे उडून गेले का? येथे आजूबाजूला घरं आहेत, नारळीची झाडे आहेत. ही कधी पडली नाहीत. समुद्रात बोटी आहेत त्या कधी पडल्या नाहीत. मात्र हा पुतळा हवेच्या वेगाने कोसळला असं सरकारमधील मंत्री सांगतात. पुतळा कोसळल्याचा सर्व दोष नेव्हीला देताहेत. नेव्हीची ख्याती मोठी आहे. सतत बर्फ वितळत असतो त्या हिमालयावरही वीरांचं स्मारक नेव्हीनं उभं केलेलं आहे. वर्षांनुवर्ष नेव्हीच्या बोटी समुद्रात उभ्या असतात. लोखंडी बोटी असतात त्यांना कधी गंज चढला नाही. मात्र तुम्ही बसवलेला इथला पुतळा कोसळला. स्वतःचं पाप झाकण्यासाठी सरकार नेव्हीला दोष देत आहे, अशी सडकून टीका संजय राऊतांनी सरकारवर केली.
गुन्हेगार ठाण्यातलेच - "हा पुतळा ज्या शिल्पकाराने बनवला आहे, त्याचे नाव आपटे आहे. ज्याला कोणताही पूर्वानुभव नाही. जो पाच फुटाच्या मूर्ती बनवत होता. त्याला भव्य-दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम कसं काय दिलं? आणि कोणी दिलं? याचा तपास आणि चौकशी झाली पाहिजे. जसं यात आपटे दोषी आहे तसंच त्याला काम देणारेही तेवढेच दोषी आहेत. त्यांचाही शोध घेतला पाहिजे. आपटेंना काम देणारे हे ठाण्यातलेच आहेत. याचे ठाणे कनेक्शन आहे. आरोपी हा ठाण्यातीलच आहे. यात अनेक गुन्हेगारांचा सहभाग आहे. त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी संजय राऊतांनी यावेळी केली. माफी मागून विषय संपत नाही, सरकारच्या गळ्याशी हे प्रकरण आलेलं आहे. सरकारला बाहेर तोंड दाखवायला जागा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात एवढी बेपर्वाई. एवढा मोठा भ्रष्टाचार हे महाराष्ट्र जनता कदापी सहन करणार नाही. 40 गद्दारांनी जरी माफी मागितली, तरी त्यांनी केलेली गद्दारी ही काही कमी होत नाही, असं राऊत म्हणाले.
पुतळा बेकायदेशीर - "या पुतळ्याबाबत जे जे स्कूल ऑफ आर्ट या सल्लागार मंडळानं हा पुतळाच बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. कारण या पुतळ्याला केवळ पाच फूट एवढी परवानगी देण्यात आली होती. पण पुतळा त्यापेक्षाही अधिक उंचीचा बनवण्यात आला. त्यामुळे हा पुतळाच बेकायदेशीर असल्याचं जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या सल्लागार मंडळाने म्हटल्याचं राऊतांनी सांगितले. तसंच मुख्यमंत्र्यांनी 100 वेळा माफी जरी मागितली तरी ती महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारली पाहिजे. माफीचे जाऊ द्या, पण या शिल्पकाराला मुळात कोणी काम दिलं ते आधी सांगा? त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे? तुमच्या घरातील कोणी आहे का? हे आधी सांगा, नंतर माफी मागा. माफी तुम्हाला मागायला लागेल. जनतेसमोर नाक रगडायलाच लागेल," अशी बोचरी टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. दरम्यान, महाराष्ट्रात एवढी मोठी दुर्घटना घडली. महाराजांचा पुतळा पडला त्यामुळे आमच्या मनावर मोठा आघात झाला. ते पाहण्यासाठी आमचे महाविकास आघाडीचे नेते इथे आले तर भाजपाच्या गुंड कार्यकर्त्यांनी आम्हाला इथे रोखण्याचा प्रयत्न केला. का अशी घटना घडल्यानंतर इथे पाहायला यायचे नाही का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
हेही वाचा...