मुंबई Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात केली होती. यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली. सरकारने या संदर्भात एक एसआयटी स्थापन करून चौकशी करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल गाडेकर यांनी दिलेत.
बोलविता धनी कोण हे शोधणार : सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जरांगे पाटील यांच्या संदर्भामध्ये आपलं काहीच म्हणणं नाही. त्यांची भाषा अयोग्य आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा कोणी करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल चौकशी केली जाईल. मात्र, त्यापेक्षा त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे चौकशी करून बाहेर काढणार, कारण हे एक मोठे षडयंत्र आहे, हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे."
दगडफेक कुणाच्या सांगण्यावरून? बैठका कुठे? : "मनोज जरांगे पाटील हे आंदोलन संपवून घरी गेल्यानंतर त्यांना पुन्हा कोणी आणून बसवलं आणि दगडफेक करण्याचा निर्णय कोणी घेतला? ज्यांनी दगडफेक करायला सांगितली, त्यांची आता सखोल चौकशी केली जाईल. पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे आंदोलन पेटले, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, पोलिसांना लाठीमार का करावा लागला? हे सुद्धा पाहावे लागेल. पोलिसांना लोकांनी मारायचे आणि आपण बघत बसायचे असे होणार नाही," असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
बैठका कोणाच्या घरी झाल्या? : "दगडफेक करण्यापूर्वी कोणाच्या घरी बैठका झाल्या? त्यांना कोणी चेतावणी दिली? याची माहिती आता समोर येत आहे. छत्रपतींचे नाव घेणार आणि दुसऱ्यांच्या आया, बहिणी काढणार हे चालणार नाही," असेही फडणवीस म्हणाले. "या प्रकरणी सखोल चौकशी करून जे कोणी बोलविता धनी आहेत, त्यांना जनतेसमोर आणणार," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा -