मुंबई -: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस आता हळूहळू जवळ येत आहे. त्यातच आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. सध्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झालाय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा गुप्तचर विभागाला अलर्ट मिळाला असून, देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवून त्यांच्या सेवेत फोर्स वनचे जवान तैनात केलेत. त्यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलंय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील निशाणा साधलाय.
मुख्यमंत्र्यांची बेकायदेशीररीत्या सुभेदार म्हणून नेमणूक: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा गुप्तचर विभागाला अलर्ट आला असून, या अहवालानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी आता फोर्स वन युनिटचे कमांडो तैनात करण्यात आले असून, देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांची बेकायदेशीर नेमणूक मोदींनी सुभेदार म्हणून केलीय. महाराष्ट्र लुटला जातोय. महाराष्ट्र बदनाम होतोय म्हणून मोदी खुश होतात. मोदींचे ते स्वप्नच आहे."
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठीक नाही: पुढे बोलताना खासदार संजय राऊतांनी सांगितले की, "फडणवीसांची सुरक्षा वाढविली, यामुळे मला धक्का बसला. स्वतःची सुरक्षा त्यांनी स्वतःच वाढविली. राज्यात गृहमंत्री स्वतः सुरक्षित नाहीत. महाराष्ट्राला चिंता वाटते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठीक नाही. ज्यांना आश्वासन दिली होती ती पूर्ण झाली नव्हती, त्यांच्यापासून धोका आहे का? राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबत खुलासा करायला हवा. इथे विरोधी पक्षातले नेते सुरक्षित नाहीत. पाच वर्षांपूर्वी त्यांना एक पत्र आलं होतं. अशा प्रकारचे निनावी फोन, पत्र आम्हालासुद्धा येतात. निवडणुका आल्या की हे जागे होतात," असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केलाय.
उद्योगधंदे महाराष्ट्र बाहेर गेले ही मोदींची देणगी : दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. शिवसेनेतील फुटीचे कारणही त्यांनी उघडपणे सांगितलं. "जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा मीही त्यांच्यासोबत होतो. ते सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरोधात होतं. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी काँग्रेससोबत युती केली. काँग्रेसला दूर ठेवा, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे." मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांचे लेक्चर आपण ठेवू. त्यांना मोदींनी काय काय असं दिलं त्याबद्दल ते बोलतात. उद्योगधंदे महाराष्ट्र बाहेर गेले ही मोदींची देणगी आहे का?" असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय.
मोदी सोनिया गांधींबद्दल काय काय बोलले: अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आमच्या लाडक्या बहिणींवर अशी टिप्पणी केली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे. आता बाळासाहेब ठाकरे हयात असते तर यांचे थोबाड रंगवले असते. आम्ही गुवाहाटीमध्ये असतानाही त्यांनी आमच्या महिलांची अशी बदनामी केली. अशा लोकांना येत्या निवडणुकीत सर्व भगिनी नक्कीच धडा शिकवतील. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले की, "सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याबाबत भाजपाचे नेते कुठल्या भाषेत बोलले होते? तेव्हा भाजपाला असा त्रास का झाला नाही? अरविंद सावंत हे जबाबदार नेते आहेत. खासदार सावंत यांनी स्पष्ट भूमिका केली होती की, मुंबादेवीमध्ये आयात केलेला उमेदवार आहे. अटल बिहारींची भाषणं पाहा ती भाषणं कोणासंदर्भात होती. मोदी सोनिया गांधींबद्दल काय काय बोलले. पराभव होत असताना अशा गोष्टीला महत्त्व दिलं जात असल्याचं सांगत राऊतांनी टीकास्त्र डागलंय. पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "अरविंद सावंत चुकीचं काय बोलले? शायना एनसी या आयात केलेल्या उमेदवार आहेत. एखादा शब्द पकडून बसाल तर मोदींच्या भाषणावरून रोज गुन्हे दाखल होतील. बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदे यांची दाढी काढून ढिंड काढली असती. बाळासाहेबांचा शिक्का तुमच्याकडे चालणार नाही," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीय.
हेही वाचा :