मुंबई Ulhasnagar Firing Incident : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार केला. या प्रकरणामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात 'गुंडा राज' सुरू असल्याची टीका केली आहे.
फडणवीस काय कारवाई करणार? : ''गोळ्या झाडणारा आमदार भाजपाचा, गृहमंत्री भाजपाचे आहेत. आता आम्हाला पाहायचं आहे या आमदारावर देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतात? फडणवीस यांच्याकडे याची उत्तरं आहेत का?" असे प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केले आहेत. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात युती धर्म पाळला नाही. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच माझ्यावर गोळीबार करण्याची वेळ आली. एकनाथ शिंदे यांच्यासारखे मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त गुन्हेगारच निर्माण होतील.' हे गणपत गायकवाड यांचं स्टेटमेंट आहे, असा खुलासाही राऊत यांनी यावेळी बोलताना केला.
'चार प्रमुख गुंड टोळ्यांना जामिनावर बाहेर काढले : ''मी मागचे अनेक दिवस सांगतोय. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून थेट गुंडांच्या टोळी प्रमुखांना संपर्क केला जात आहे. जे गुंड राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांना जामिनावर सोडवून बाहेर काढलं जातं आहे. पुणे, नाशिक, नागपूर इथे अनेक टोळ्यांचे प्रमुख सध्या जामिनावर बाहेर पडले आहेत. निवडणुकीत मदत व्हावी यासाठी गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढले जात आहे',' असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. पुण्यात जे गुंड जामिनावर बाहेर आहेत त्यांची नावे जाहीर करणार आहे. ''चार प्रमुख गुंड टोळ्यांना जामिनावर बाहेर काढले आहे. मुंबईमध्ये तेच सुरू आहे. कायद्याचे राज्य वगैरे काही नाही. यांना फक्त निवडणूक जिंकायच्या आहेत,'' असा आरोपही त्यांनी केला आहे.
"कुठे आहेत गृहमंत्री? : कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. असं बोलतात. हा न्याय फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासाठी आहे का? चर्चा करण्याइतकं प्रकरण साधं आहे का? याच ठिकाणी सर्वसामान्य किंवा विरोधी पक्षातील एखादा नेता असता तर आतापर्यंत विना चौकशी फासावर लटकवले असतं. नागपूर, ठाणे, पुणे, मुंबई येथे राजकीय स्वर्थासाठी गुन्हेगारांना, माफियांना तुरुंगातून सोडवून आपला राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न आहे. भाजपावाल्यांना तोंड आहे का? आता काय उत्तर देणार?, असा प्रश्न देखील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
जामीन देण्यासाठी गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "या सर्व गुन्हेगारी घटनांमध्ये राजकीय पाठबळ आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय काम करत आहे. महाराष्ट्र एवढा रसातळाला कधीच गेला नव्हता. देवेंद्र फडणवीस न्यायी आहेत. ते स्वतः वकील आहेत. राम तुमच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांनी न्याय द्यावा. आता ज्याने गोळीबार केला त्यालाच जामीन देतील. पुण्यात तीन भयंकर गुन्हेगारांना जामीन देण्यासाठी तीन मंत्र्यांनी कसा प्रयत्न केला याचे पुरावे मी लवकरच तुम्हाला देणार आहे. राजन साळवी व कुटुंबीयांना जामीन नाही पण गोळीबार करणाऱ्यांना जामीन द्यावा यासाठी गृहमंत्री यांच्या कार्यालयातून फोन जाईल."
हेही वाचा :
1 उल्हासनगरमध्ये भाजपा आमदारानं शिंदे गटाच्या नेत्यावर झाडल्या 6 गोळ्या; आमदार अटकेत
3 भाजपा आमदार गोळीबार प्रकरण; देवेंद्र फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश