मुंबई Weather update Mumbai : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दहा दिवसानंतरही धोक्याचा इशारा देण्यात येणारा तीन नंबरचा बावटा कायम आहे. गेटवे-एलिफंटा, जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक अद्यापही खंडित आहे. यामुळे लॉन्च चालक आणि व्यावसायिकांवर उपासमारीचं संकट आलं आहे.
18 जूनपासून खराब वातावरण : 18 जुलैपासून खराब हवामान, वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका नवी मुंबई, पनवेल परिसराला बसू लागला आहे. बोट प्रशासनाच्या माध्यमातून धोक्याचा इशारा देण्यात आल्यानं सागरी प्रवासी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पावसाळी हंगामात सुट्टीच्या दिवशी २०-२५ लॉंचेस सुमारे १००० ते १५०० पर्यटकांना घेऊन एलिफंटा लेण्या पाहण्यासाठी जातात. ३० मिनिटांच्या समुद्र सफरीचा आनंद लुटण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया इथं बोटीतून दररोज २५०० ते ३००० पर्यटक येतात.
तीन नंबरचा बावटा लावल्यानंतर जलवाहतूक ठप्प : "खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे सर्वच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया इथून येणारी पर्यटक वाहतूक गुरुवारपासून ठप्प झाली आहे. बंदरात आदळणाऱ्या आणि उसळणाऱ्या उंचच उंच लाटा, फेसाळलेला समुद्र यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान सागरी वाहतूक केव्हाही अनियमित कालावधीसाठी बंद करण्यात येत असते. त्यामुळे बेटावर पावसाळ्यातही जाणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटकांवर माघारी परतण्याची वेळ येते. यामुळे लॉंच मालकांना दररोज लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान होत आहे," अशी माहिती गेटवे-एलिफंटा जलवाहतूक संस्थेचे अध्यक्ष इक्बाल मुकादम यांनी दिली.
गुरुवार संध्याकाळपासून प्रवासी वाहतूक बंद : "तीन नंबरचा धोक्याचा इशारा देणारा बावटा जोपर्यंत खाली उतरत नाही, तोपर्यंत अशीच स्थिती राहील, अशी माहिती गेटवे-मुंबई बंदराचे निरिक्षक गुंजन यांनी दिली. पर्यटकांअभावी व्यवसायही मागील पाच दिवसांपासून ठप्प झाला आहे. यामुळे बेटावरील पर्यटक आधारित व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट आल्याचं स्थानिक व्यावसायिकांचं म्हणणं आहे. भाऊचा धक्का ते मोरा या सागरी मार्गावरुनही गुरुवारी संध्याकाळपासूनच प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेनं घेतला आहे. यामुळे भाऊचा धक्का ते मोरा आणि जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक पाच दिवसांपासून कोलमडली आहे," अशी माहिती मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेचे अनिल परब यांनी दिली.
रेवस करंजा सागरी मार्ग बंद : रेवस-करंजा सागरी मार्गही बंद असल्यानं जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या सागरी मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे दोन हजार प्रवासी आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. बोटी बंद असल्यानं प्रवासी आणि कामगारांना रेल्वे, एसटी, बस, खासगी वाहनानं कामाच्या ठिकाणी पोहोचण्याची वेळ आली आहे. खराब हवामानामुळे स्थानिक मासेमारीवरही गंडांतर आले आहे. त्यामुळे स्थानिक मासळी बाजारात मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्यातरी हजारो प्रवासी आणि पर्यटकांना धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा उतरुन सागरी मार्ग पूर्ववत सुरू होण्याच्या प्रतिक्षेत पर्यटक आणि प्रवास आहेत.
हेही वाचा