अमरावती Water Apple In Melghat : अंदमान निकोबार बेटावर मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या 'वॉटर ॲप्पल' ची चव आता विदर्भातही चाखायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या धामणगाव गढी गावालगत रमेश जोशी यांच्या नर्सरीत 'वॉटर ॲप्पल' बहरल्याचं बघायला मिळतंय. उन्हाळ्यात हे फळ अतिशय गुणकारी असून हे फळ खाण्याचे अनेक फायदे असल्याची माहिती जोशी नर्सरीचे संचालक आणि वनस्पती शास्त्राचे अभ्यासक असणारे चेतन जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
गोव्यावरून आणले रोप : आज जोशी नर्सरी आणि लगतच्या परिसरात वॉटर ॲप्पलची पाच झाडं आहेत. या सर्व झाडांना आता फळ देखील लागली आहेत. पाच वर्षांपूर्वी जोशी नर्सरीचे संचालक रमेश जोशी यांनी गोव्यावरून वॉटर ॲप्पलचे एक रोप आणून मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या त्यांच्या नर्सरीमध्ये लावले. त्यानंतर रमेश जोशी यांनी या झाडापासून आणखी चार रोपं तयार करून नर्सरीच्या परिसरात लावलीत. आज जोशी यांच्या नर्सरी परिसरात वॉटर ॲप्पलची पाच झाडं छान बहरली आहेत. तर, येणाऱ्या काळात वॉटर ॲप्पलचे पन्नास रोपं आम्ही तयार करणार आहोत. आपल्या भागात देखील हे चवदार आणि पौष्टिक फळ रुजावं, वाढावं हा आमचा प्रयत्न असल्याचं रमेश जोशी आणि चेतन जोशी यांनी सांगितलं.
गुणकारी फळाचे असे आहे वैशिष्ट्य : वॉटर ॲप्पल या फळात कॅलरीचे प्रमाण कमी आहे. मात्र, यात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणात असून हे फळ हाय अँटीऑक्सिडंट आणि बीटाकॅरोटीनयुक्त आहे. या फळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असून उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्यानं शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो, असं चेतन यांनी सांगितलं.
वॉटर ॲप्पल खाण्याचे असे आहेत फायदे : सुरुवातीला पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे असणारे हे फळ पिकल्यावर लाल रंगाचे होते. सुरुवातीच्या अवस्थेत हिरवेगार फळ देखील अतिशय चवदार लागतं. विटामिन सी चा उत्तम स्त्रोत असणारे हे फळ विषारी रसायनांमुळं शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळते. या फळाच्या सेवनामुळं हृदयविकार, कर्करोग आणि संधिवात यासारखे आजार होत नाहीत. या फळात विटामिन सी चं प्रमाण अधिक असल्यामुळं हे फळ अँटीऑक्सिडेंट म्हणून देखील काम करत असल्याची माहिती चेतन जोशी यांनी दिली. तसंच या फळाच्या सेवनामुळं रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते, पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील हे फळ खाणं लाभदायक आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील हे फळ गुणकारी असून या फळाचं नियमित सेवन केल्यास डोळ्याच्या समस्या कायमच्या सुटतात.
नर्सरीत येणारा प्रत्येकजण चाखतो फळ : चिखलदराकडे जाताना मेळघाटच्या अगदी पायथ्याशी असणाऱ्या जोशी नर्सरीला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जोशी कुटुंबाच्या वतीनं आपल्या नर्सरीतील खास वॉटर ॲप्पल चाखायला देतात. यासोबतच हे फळ नेमकं काय आहे? ते कुठून आणलंय आणि त्याचा काय फायदा? याची देखील माहिती दिली जाते. गोव्यातून आणलेलं हे फळ येत्या काही वर्षात आपल्या भागात देखील जिकडं तिकडं उपलब्ध व्हावं, हाच आमचा प्रयत्न असल्याचं रमेश जोशी म्हणाले.
हेही वाचा -
- जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू - Amravati water issue
- 'सदाशांती'नं बांधली अनाथांची लग्नगाठ; सपना, रुपालीला मिळवून दिलं हक्काचं सासर; आधारगृहाचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग - Orphan Marriage In Amravati
- एकेकाळी भीषण पाणी टंचाई तर आता पाणीच पाणी, जाणून घ्या मेळघाटातील 'या' गावाची कहाणी - Amravati