अमरावती Amravati Lok Sabha Election 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 63.67 टक्के मतदान झाले असून जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बहुल क्षेत्रातील मतदारांनी मतदानासाठी सर्वाधिक जागरूकता दाखविली. अमरावती मतदारसंघात मेळघाटात सर्वाधिक 75 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत तीन टक्क्यांनी मतदान वाढले आहे. मेळघाट विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या एकूण पाच गावात मतदारांनी बहिष्कार टाकल्यामुळे तिथली मतदानाची टक्केवारी शून्य आहे.
मतदार मतदान केंद्रावर ठाण मांडून : मेळघाटातील धारणी तालुक्यात येणाऱ्या चाकर्दा या गावात मतदान प्रक्रिया दरम्यान सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी शाळा या मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्यामुळे या ठिकाणी मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. असे असले तरी सायंकाळी सहा वाजता नंतर मतदान केंद्र परिसरात मतदानासाठी 500 मतदार आले होते. ईव्हीएम मशीन दुरुस्त होण्याची वाट मतदारांनी पाहिली. रात्री साडेनऊ ते दहा वाजे दरम्यान ईव्हीएम मशीन दुरुस्त झाल्यावर या ठिकाणी मतदान प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली. ईव्हीएम मशीन दुरुस्त होण्याची वाट पाहत मतदान केंद्रावरच ठाण मांडून बसलेल्या मतदारांनी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
पाच गावात शून्य टक्के मतदान : अमरावती लोकसभा मतदारसंघात विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या धारणी तालुक्यातील रंगूबेली, कुंड, धोकरा, खांम, दा किन्ही खेडा, खोकमार या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे या पाचही गावात शून्य टक्के मतदान झाले. हे पाचही गाव मिळून 2 हजार मतदारांची संख्या आहे. दुर्गम भागात असणाऱ्या या गावांमध्ये रस्त्याची सुविधा नाही, वीज पुरवठा देखील नाही, आरोग्याची देखील कुठलीच सुविधा नसल्यामुळे या पाचही गावातील ग्रामस्थांनी गत वर्षभरापासून आमच्या गावाकडे लक्ष द्या अशी विनंती लोकप्रतिनिधी सह प्रशासनाकडे केली होती; मात्र त्यांच्या अडचणींची दखल कोणीही घेतली नसल्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
पावसामुळे अंजनगाव सुर्जीत उशिरापर्यंत मतदान : शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. अंजनगाव सुर्जी येथील काही मतदान केंद्रावर सायंकाळी पाच ते सहा दरम्यान मतदारांची गर्दी वाढली. याच वेळेस मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे मतदान केंद्राच्या आवारात असणाऱ्या मतदारांनी पावसापासून बचावासाठी मतदान केंद्र परिसरातच मिळेल तिथे सुरक्षित ठिकाण गाठले. पावसाचा जोर कमी झाल्यावर मतदान केंद्र बाहेर पुन्हा मतदारांची मतदानासाठी रांग लागली. रात्री दहा वाजेपर्यंत या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे एकूणच मतदार संघातील मतदानाची नेमकी टक्केवारी करण्यासाठी उशीर लागला.
असे झाले मतदान : अमरावती लोकसभा मतदारसंघात बडनेरा विधानसभा मतदारसंघात 55.78 टक्के मतदान झाले असून अमरावतीमध्ये 57.51 टक्के, तिवसांमध्ये 64.14 टक्के, दर्यापूरमध्ये 66.68 टक्के, मेळघाटात 71.55 टक्के आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघात 68.84 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 63.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघात 60.36 टक्के मतदान झाले होते.
हेही वाचा :
- कोल्हापूरच्या गादीपुढे नरेंद्र मोदी कोणी नाहीत; संजय राऊतांचं पंतप्रधानांवर टीकास्त्र - Sanjay Raut
- अहमदनगरात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढतीत आणखी एका 'निलेश लंके'ची उडी; रोहित पवारांचा विखेंवर हल्लाबोल - Lok Sabha election
- नावारूपाला येणाऱ्या नेत्यांना गायब करणं ही काँग्रेसची परंपरा, खासदार उदयनराजेंचा खळबळजनक आरोप - MP Udayanraje Bhosale