नागपूर : " बांगलादेशात अराजकता निर्माण झाली आहे. फाळणीच्या वेळी बांगलादेशात हिंदूंची संख्या 32 टक्के होती. ती आता आठ टक्क्यांपेक्षा कमी झालीय. तिथले हिंदू सतत जिहादी अत्याचाराला बळी पडत आहेत. त्यामुळं प्रत्येक हिंदूनं किमान दोन मुलांना जन्म द्यावा," असं आवाहन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा प्रांताचे प्रादेशिक मंत्री गोविंद शेंडे यांनी केलं. ते आज नागपुरात बोलत होते.
"बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर अराजकता निर्माण झाली आहे. याशिवाय तिथं राहणाऱ्या हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची तात्काळ खात्री करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं आज केली. "बांगलादेशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन झालं पाहिजे. अल्पसंख्याक समाजाला मानवी हक्क मिळाले पाहिजेत," अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलीय.
हिंदूंवर अत्याचार : " आपला शेजारी बांगलादेशाला अराजकतेनं ग्रासलं आहे. पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर देश सोडलाय. त्यामुळं अराजकतावादी अधिक प्रबळ झाले आहेत. कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कुचकामी झाली आहे. या अत्यंत कठीण परिस्थितीत अतिरेकी जिहादी घटकांनी हिंदू समाजावर लक्ष केंद्रित केलं आहे. अल्पसंख्यांकावर अत्याचार सुरू आहे," असा दावा विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा प्रांताचे प्रादेशिक मंत्री गोविंद शेंडे यांनी केला आहे.
हिंदू 32% वरून 8% वर : " बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची धार्मिक स्थळे, व्यावसायिक प्रतिष्ठानं, घरांचं नुकसान झालं आहे. बांगलादेशातील प्रत्येक जिल्ह्यात भयंकर कृत्ये होत असल्याची माहिती आहे. अतिरेक्यांच्या निशाण्यापासून कब्रस्तानही वाचलेलं नाही. मंदिरांचं मोठं नुकसान झालं आहे. बांगलादेशात क्वचितच असा जिल्हा असेल जो हिंसाचाराचा लक्ष्य बनला नसेल. बांगलादेशातील हिंदूंची घरं, दुकानं, कार्यालयं, व्यावसायिक प्रतिष्ठानं, स्त्रिया, मुलं मंदिरंही सुरक्षित नाहीत. तिथं राहणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळं सरकारनं निर्णय घ्यावा, असं मत शेंडेंनी व्यक्त केलंय.
हिंदूंना भारतात येऊ द्या : " बांगलादेशातील भीषण परिस्थितीमुळं भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंचं केंद्र सरकारनं पुनर्वसन करावे, अशीही मागणी शेंडे यांनी केलीय. परिस्थितीचा फायदा घेत जिहादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. याबाबत दक्षता घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आमच्या सुरक्षा दलांनी सीमेवर कडक नजर ठेवली पाहिजे," असं अवाहन त्यांनी केलंय.
हिंदूंना किमान दोन मुले असावीत : " लोकसंख्येतील असमतोलाचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. त्यामुळं प्रत्येक हिंदूना किमान दोन मुलं असावीत. एकल मूल ही संकल्पना समाजात रुजतेय. त्यामुळं हिंदूंची लोकसंख्या खूपच कमी झालीय. त्यामुळं देशात अराजकता निर्माण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. ज्या दिवशी हिंदू अल्पसंख्याक होतील त्या दिवशी लोकशाही धोक्यात येईल," असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-