छत्रपती संभाजीनगर Verul Ajanta International Festival : वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव नव्या वादात अडकला आहे. कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या न्यायाधीश यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर महोत्सव समितीनं रविवारी जाहीर माफी मागितली. शुक्रवारी पहिल्या रांगेत न्यायाधीशांसाठी आरक्षित आसनावर त्यांच्या कुटुंबीयांसोबत बसले असताना त्यांना सुरक्षा रक्षकाने हाताला धरून मागच्या रांगेत बसायला सांगितलं. याप्रकारामुळं न्यायाधीश कार्यक्रमातून निघून गेले. तर शनिवारी वकील संघटनेने मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय.
पहिल्या दिवशी घडला प्रकार : बहुचर्चित असलेल्या वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची दणक्यात सुरुवात झालीय. पहिल्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे प्रमुख आकर्षण होते. जिल्हाधिकारी यांच्या विशेष अधिकारात रात्री बारापर्यंत कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. रात्री सव्वासहा वाजता राहुल देशपांडे यांचं सादरीकरण सुरू होणार त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती असलेले औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश अचानक उठून निघून गेले. काय झालं काही कळत नसताना मुख्य मार्गदर्शक दिलीप शिंदे यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. त्यावेळी न्यायाधीशांना त्यांच्या आसनावरून उठवण्यात आल्याने ते आणि इतर न्यायाधीश निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यावेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायाधीश यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापुढं आम्हाला बोलावू नका असं न्यायाधीशांनी ठणकावून सांगत कार्यक्रम स्थळ सोडलं.
रविवारी मागितली जाहीर माफी : घडलेल्या प्रकाराबाबत शनिवारी दिवसभर या विषयावर चर्चा रंगल्या, याबाबत अधिकृत माहिती कोणीही देण्यास तयार नव्हतं. मात्र, रविवारी सगळ्या प्रसिद्धी माध्यमात वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजन समितीच्या वतीनं जाहीर माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. त्यानुसार "न्यायाधीश आणि त्यांचे कुटुंबीय यांना योग्य प्रकारे आसन व्यवस्था न झाल्याने, तसेच त्यांच्यासोबत झालेल्या असुविधांसाठी वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजन समितीच्या वतीनं जाहीर दिलगिरी व्यक्त करण्यात येते."
काय आहे माफीनामा? : या निवेदनाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सर्व न्यायाधीश आणि त्यांचे कुटुंबीय यांची वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजन समितीतर्फे जाहीर माफी मागण्यात आली आहे, असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात समितीचे मुख्य मार्गदर्शक दिलीप शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पर्यटन विभाग उपसंचालक विजय जाधव यांचं नाव नमूद करण्यात आलंय. मात्र, शनिवारी वकील संघटनेने याबाबत तीव्र निषेध व्यक्त केलाय. सदरील घटनेत दोषी असणारे अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांची चौकशी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वकील संघाच्या वतीनं करण्यात आलीय.
हेही वाचा -
- Nana Patekar apology: तो सीनचा एक भाग होता, पण मार खाणारा दुसराच निघाला : नाना पाटेकरचा माफीनामा
- CM Nitish Kumar Apologized : मुख्यमंत्री नितिश कुमारांचा 'त्या' वक्तव्यावरुन माफीनामा, पहा काय म्हणाले?
- केरळमध्ये चोराला उपरती, 700 रुपये होते चोरले, अनेक वर्षांनंतर चोराने माफीनाम्यासह परत केले 2000 रुपये