छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024 : "महाविकास आघाडीत 15 जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांचा घोळ संपल्यावर निर्णय घेऊ. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेपर्यंत वाट पाहणार, अन्यथा इतर पर्याय आहेत," असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. "मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आरक्षणाचा लढा सुरू ठेवायचा असेल, तर त्यांनी निवडणूक लढवावी, विधानसभेत आपल्या मागण्या मान्य करुन घ्याव्यात. सध्या त्यांचा व्हिडिओ मोडतोड करुन बाहेर आणण्याच्या हालचाली सुरू आहेत, त्यामुळे ते बदनाम होतील," असा आरोप देखील त्यांनी केलाय.
आमच्याकडं 48 जागांचा पर्याय : "ज्या जागा लढले नाहीत, त्या ठिकाणी यांचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे आम्ही मागणं म्हणजे त्यांच्यात वाद न होता घेणं कसं होईल. राष्ट्रवादी न लढलेल्या जागा त्यांच्याकडं कशा मागणार, जिथं जे लढतात त्यांना जागा मागणार. माझ्याकडं अजून 48 जागांचा पर्याय खुला आहे. शेवटचा फॉर्म भरेपर्यंत मी वाट पाहणार," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
संजय राऊत नेमके कोणाचे प्रवक्ते : महाविकास आघाडीतील नेते शेवटपर्यंत सोबत राहतील, याची खात्री करावी. त्यांचे प्रवक्ते एकच आहेत, ते नेमके कोणाचे शिवसेना, राष्ट्रवादी की काँग्रेसचे आहेत हे कळत नाही," असा आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
काँग्रेसकडून अद्याप उत्तर मिळाले नाही : "शरद पवार म्हणतात भांडण नाही, शिंदे गटानं आरोप केला, त्यांना ते अपेक्षित आहे. मी कान फट्ट्या राजकारणी नाही. काँग्रेसकडून अद्याप उत्तर मिळाले नाही, त्यांचं पत्र म्हणजे आमच्यासाठी अधिकृत आहे. आम्ही काय केलं पाहिजे म्हणजे तुमचा विश्वास बसेल. छत्रपती संभाजीनगर ही जिंकलेली जागा आहे, सोडणार कशी. संदीपान भुमरे लढले तर आम्हाला सोप होईल. त्यांनी कोणीही लढू नये, मला पाठिंबा दिला तर मी भाजपा आपटून दाखवतो. अकोलाबाबत तिथं बोलणार. मला पाडण्यासाठी दोन ते तीन वेळेस काँग्रेसनं मुस्लीम उमेदवार दिला. यावेळी मुस्लीम लोकांनी त्यानां सांगितलं की उमेदवार दिला तर मर्डर करू. एक दोन वेळी दंगल झाली, त्यावेळी वंचितनं साथ दिली. त्यामुळे त्यांनी आता त्यांना ताकीद दिली," असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी : "मनोज जरांगे यांना वंचित तर्फे पाठिंबा दिला, मात्र त्यांनी अद्याप मागितला नाही. आमच्या पुरता विषय संपला, मी सल्ला दिला. ते माझं कौतुक करतात, त्याबाबत त्यांना विचारा. त्यांना राजकीयरित्या संपवण्याची तयारी झाली आहे. त्यांची काही व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर ते टाकले जाणार आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब करण्याचं काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही," असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. "जे आरक्षण मिळालं ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणात यावं लागेल. त्यांच्यातील अराजकीय समर्थक आहेत, त्यांना देखील असं वाटते, त्यांचीच मागणी आहे. त्यामुळे सभागृहात उभं राहून बोलणं गरजेचं आहे. त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. एका व्यक्तीनं भल्याभल्यांना रस्ता दाखवला, हे विसरता कामा नये. हे बिल मान्य नसेल तर दुसरे बिल ते आणू शकतात," असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं
आचारसंहिता लवकरच लागणार : "माझ्या अंदाजानुसार शुक्रवारी अचासंहिता सुरू होईल, मतदान तारीख आणि निकालाची तारीख पण जाहीर होईल. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत थांबणार अन्यथा आमचे पर्याय खुले आहेत. जे आमच्यासोबत बसतील त्यांच्या सोबत जाऊ, हे आघाडीची भूमिकेवर अवलंबून राहील. मुंबईमधील अद्याप सूत्र ठरलं नाही, प्रसार माध्यमांचा वापर करुन संभ्रम निर्माण केले जात आहेत. त्यापेक्षा सत्य शोधून मांडले पाहिजे," असं देखील त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :