नांदेड Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी वंचित बहुजन आघाडीनं मंगळवारी रात्री उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत नांदेडमधून अविनाश भोसीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीनं निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उतरविल्यानं आता नांदेडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. 'वंचित'मुळे कोणाला दगाफटका बसणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत अविनाश भोसीकर ? : अविनाश भोसीकर यांची ओबीसी समाजावर चांगली पकड आहे. काही दिवसांपूर्वी ते प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पक्षात होते. त्यांनी पक्षांकडून लोकसभा उमेदवार असल्याचं जाहीर केलं होतं. नांदेडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या सभेत भोसीकर यांनी प्रकाश शेंडगे आणि वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना एकाच मंचावर आणलं होतं. या सभेत ओबीसी समाज आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा देखील नेत्यांनी व्यक्त केली होती. ओबीसीच्या या सभेनंतर अविनाश भोसीकर यांचं नाव चर्चेत आलं. दरम्यान दोन दिवसापूर्वी भोसीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. अखेर वंचितकडून भोसीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अविनाश भोसीकर यांनी यापूर्वी देखील लोकसभा निवडणूक लढवली होती. विद्यार्थी चळवळीपासून ते सक्रिय आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं लिंगायत समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यात वसंत मोरे : वंचित बहुजन आघाडीनं पुण्यातील मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वसंत मोरे यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'जय महाराष्ट्र' केला होता. पुण्यात वसंत मोरे यांना वंचितनं उमेदवारी दिल्यानं भाजपाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
हेही वाचा :