मुंबई Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प मांडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? याची यादीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली.
प्रत्येक बजेटला एक थीम असते : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधकांनी या बजेटनंतर काय प्रतिक्रिया द्यायची, हे आधीच लिहून ठेवलं होतं. त्यांची प्रत्येकाची प्रतिक्रिया आधीच ठरली होती. विरोधकांकडून चुकीचं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक बजेटला एक थीम असते. यावेळी साधारणपणे पूर्व किनारपट्टी अशा प्रकारची थीम आहे. म्हणून अर्थसंकल्पात काही राज्यांच्या विशेष उल्लेख झाला. त्यामुळं काही ठराविक राज्यांना विशेष दर्जा दिला, असं म्हणायचं काही कारण नाही."
या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी असलेल्या तरतुदींची ही प्राथमिक यादी, फेक नॅरेटीवच्या राजकरणाच्या पलीकडे जाऊन विरोधकांनी अर्थसंकल्प समजून घेण्याची गरज अधोरेखित करणारी आहे…!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2024
अजून बरेच काही आहे…#UnionBudget2024 #Budget2024 #BudgetForViksitBharat pic.twitter.com/pqMcfgLTgN
वचननामाच्या भरवशावर देश चालत नसतो : उपमुख्यमंत्री फडवणीस पुढे म्हणाले की, "अर्थसंकल्प सादर करत असताना काही राज्यांची नावं आल्यानं विरोधी पक्ष नेत्यांनी काहीही विचार न करता घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं पाहिजे. परंतु त्यांच्या वचननाम्यामध्ये फक्त खटाखट-खटाखट होतं. काँग्रेसची राज्य असलेल्या ठिकाणी यांचं खटाखट पाहायला मिळत नाही. केंद्रात आणि राज्यात येणार नसल्यानं ते वचननामे तयार करतात. अशा प्रकारच्या वचननामाच्या भरवशावर देश चालत नसतो." उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांना खोचक टोला लगावला. ते म्हणाले, "मला या गोष्टीचा आनंद आहे की, आमचं बजेट हे विजय वडेट्टीवारांनादेखील भावलं आहे. मला विश्वास आहे की, ते उरलेलं बजेटदेखील वाचतील," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय? : अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? याची यादीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत वाचून दाखविली. "महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजनेला 400 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 4066 कोटी, रेसिडेंट एग्रीकल्चर 598 कोटी, महाराष्ट्र ॲग्री बिजनेससाठी प्रोजेक्ट 150 कोटी, एमयूटीपी 3 मुंबईकरता महत्त्वाचा प्रकल्प म्हणून 908 कोटी, मुंबई मेट्रोसाटी 1087 कोटी, दिल्ली - मुंबई कॉरिडोर 499 कोटी, एमएमआर ग्रीन अर्बन मोबिलिटीकरिता 150 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्पाकरिता 500 कोटी या गोष्टी महाराष्ट्राला मिळाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मोदींच्या अजेंड्यावर महाराष्ट्र राज्य प्रथम : "विनाकारण नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ नेरेटिव्हसाठी काम करू नका. आपल्या राज्याला काय मिळालं पाहिजे, अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा. मी दाव्यानं सांगतो, पंतप्रधान मोदींच्या अजेंड्यावर महाराष्ट्र राज्य प्रथम आहे. महाराष्ट्राच्या विकासाला भरपूर पैसा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथर शिंदे यांच्या नेतृत्वात ज्या गोष्टी मागितल्या, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील," असा दावा फडणवीस यांनी केला.
हेही वाचा
- "केंद्र सरकारचा गोडवा गाणाऱ्या महायुतीनं महाराष्ट्रासाठी काय आणलं?"; अर्थसंकल्पावरुन विरोधकांची सरकारवर टीका - Union Budget 2024
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा? शेतकऱ्यांनी केली 'ही' मागणी - Budget 2024 Expectations
- "तरुणांनो गाव सोडा आणि शहरात हमाली करा"; अर्थसंकल्पावर शेतकरी नेत्यांची टीका - Budget 2024