मुंबई Unemployment Rate Increased : एकीकडे देशात बेरोजगारी कमी झाली असून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत असताना दुसरीकडं मात्र बेरोजगारीचे भयाण वास्तव समोर आलंय. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत बेरोजगारीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जारी केलेल्या आकडेवारीनुसार 20 ते 34 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
बेरोजगारी दर 43 टक्क्यांहून 45 टक्क्यांवर : सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ही संस्था देशातील अर्थव्यवस्था, जीडीपी तसंच बेरोजगारीबाबत आकडेवारी जाहीर करत असते. त्याचप्रमाणे 2023 ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत 2022 च्या तुलनेत देशात एकूण बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी बेरोजगारीचं प्रमाण 43 टक्के होतं. तर यावर्षी बेरोजगारी 45 टक्क्यावर गेली आहे. मागील तीन महिन्यात तीन टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे, असं संस्थेनं म्हटलंय.
20 ते 34 वयोगटामध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक : सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 34 वयोगटातील तरुण-तरुणींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. 2023 च्या तुलनेत 2022 मध्ये बेरोजगारी दोन टक्क्यांनी कमी होती. मात्र, 2023 च्या शेवटच्या तीन महिन्यात बेरोजगारी 45 टक्क्यांवर पोहोचली आहे.
देशभरामध्ये रोजगारीचे भाजप मोठे आकडे सांगत आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. रोजगारनिर्मिती झाली नसून, भाजपाच्या काळात मोठी बेरोजगारी वाढली आहे. फक्त रोजगारनिर्मितीचे आकडे वाढवून, फुगवून सांगितले जाताहेत. ही आकडेवारी फेकाफेकीची आहे- महेश तपासे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
...मग अर्थव्यवस्था सुस्थितीत कशी? : या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत बँकिंगतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी म्हणाले की, "मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बेरोजगारीचा आकडा वाढला आहे. याचाच अर्थ ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना आणि तरुणींना रोजगार नाही. एकीकडे बेरोजगारीचा टक्का वाढताना दुसरीकडे अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचं सत्ताधारी भाजपा कोणत्या आधारावर म्हणतंय?", असा सवाल त्यांनी केला. तसंच देशात राम मंदिराचा उत्सव साजरा केला जात असताना, भाजपानं या आकडेवारीकडेदेखील लक्ष दिलं पाहिजे, असा टोलाही उटगी यांनी भाजपाला लगावला आहे.
बेरोजगार आत्महत्या करतील : "मागील आठ ते दहा वर्षात बेरोजगारी वाढली आहे. काही प्रमाणात रोजगारनिर्मिती शहरी भागात होत आहे. ग्रामीण भागात बिल्कुल रोजगारनिर्मिती होत नाही. त्यामुळं 20 ते 34 वयोगटातील तरुणांच्या हाताला काम नाही. काम नसल्यामुळं काहींना उपासमारीला सामोरं जावं लागतंय. अशा परिस्थितीत अराजकता माजेल आणि बेरोजगार तरुण आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलतील", अशी भीतीदेखील विश्वास उटगी यांनी यावेळी व्यक्त केली.
100 दिवसानंतर काय? : "सरकार 'मनेरगा' या योजनेच्या माध्यमातून गाव-खेड्यातील लोकांना, मजूरांना, शेतकऱ्यांना शंभर दिवस पुरेल एवढं काम देते. मात्र, त्या शंभर दिवसानंतर शेतकऱ्यांनी आणि मजूरांनी काय करायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. शंभर दिवसानंतर यांना कोणतंही काम मिळत नसून, हे सर्व बेरोजगार होत आहेत. हे भयाण वास्तव आपण मान्य केलं पाहिजे. तसंच रोजगारनिर्मितीबाबत सरकार खोटं बोलतंय" असा आरोपदेखील उटगी यांनी केला.