पालघर CM Eknath Shinde : काँग्रेसकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या कोचिंग क्लासमध्ये प्रशिक्षण घेऊन कोरोना काळात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना इतरांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करून त्यांचा जो पानउतारा केलाय त्याचं पाप उद्धव ठाकरे कुठं फेडणार? असा खणखणीत प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय.
चार बोटं आपल्याकडं असतात : "आमच्यावर गद्दार, खोके घेतल्याचा आरोप करतात. परंतु, त्यांच्या या बोलण्याला काहीही अर्थ नाही. उलट एक बोटं दुसऱ्याकडं करताना चार बोटं आपल्याकडं असतात याचं भान उद्धव ठाकरे यांना नाही," असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाकरे यांना लगावलाय. "ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे गहाण टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला आहे" असं म्हणत 'शिवसैनिकांचा प्राण असलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण आपल्याकडे आल्यामुळे त्यांना पोटशूळ उठला आहे,' असा थेट टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांना यावेळी लगावलाय.
शिवसैनिकांच्या घामाचे पन्नास कोटी घेतले : "उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांच्या अहंकारी वृत्तीने आपण मागे गेलो. काँग्रेसच्या कट, करप्शन आणि कमिशनचा अजेंडा उद्धव ठाकरे यांनी राज्यात राबवला. तसंच, शिवसेनेतील फुटीनंतर आमच्याकडं शिवसैनिकांच्या घामाचे पन्नास कोटी रुपये त्यांनी मागितले" असा गंभीर आरोप करत, "आम्हाला संपत्ती नको, पैसे नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. तसंच, आमची प्रवृत्ती देण्याची आहे." घेण्याची नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
ठाकरे गटाला तिहारही पुरणार नाही : राज्यातील गोळीबाराच्या घटनांचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल खेद व्यक्त केलाय. परंतु, ठाकरे आणि त्यांच्या कंपूच्या गुन्हेगारीच्या आणि गैरव्यवहाराच्या प्रकरणाचा तपास करायचा झाला, तर त्यांना तिहार जेलही पुरणार नाही असा दावा करत, सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन यांच्या प्रकरणातील पुरावे कोणी मिटवले? असा थेट प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केलाय.
हेही वाचा :
1 लोकलच्या विविध मार्गांवर आज मेगाब्लॉक, कसं असेल गाड्यांचं वेळापत्रक? वाचा सविस्तर
2 बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
3 अभिषेक घोसाळकर खून प्रकरण नेमकं काय ? 'मॉरिस भाई'नं का केला थंड डोक्यानं खून आणि नंतर आत्महत्या...!