धाराशिव Uddhav Thackeray On Amit Shah : "अमित शाहा यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे आणि भाजपाचा मुख्यमंत्री अडीच वर्षे होईल, अडीच वर्षाच्या काळात भाजपाला सांभाळून घ्या असं वचन गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं होतं. मात्र ते वचन मी दिलंच नाही, अशी बोंब मारत असले, तरी मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, की होय अमित शाहांनी मातोश्रीवर येऊन दिलेलं वचन तोडलं," अशी भावनिक साद शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केलं.
'यांची' होती प्रमुख उपस्थिती : उमरगा इथल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेत ते गुरुवारी बोलत होते. यावेळी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा ओमप्रकाश राजे निंबाळकर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आ कैलास पाटील, प्रवक्त्या सुषमा अंधारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील, महेश देशमुख, नाना भोसले, विजय वाघमारे, सुभाष राजोळे, आश्लेष मोरे, अमित चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते. पुढं बोलताना शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले की, "अट्टल आणि सच्चा शिवसैनिक काय असतो, हे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे मूर्तीमंत उदाहरण आहेत," असं सांगत त्यांनी दोघांचं जाहीर अभिनंदन केलं.
सभेत निघालेल्या सापाला दूध पाजलं : "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 1995 सालच्या सभेत एक साप निघाला होता. त्याला आपण दूध पाजलं, तर तो आता कोरेक्स पित आहे. त्या सापाला त्याची जागा बरोबर दाखवायची, असा जबरदस्त प्रहार करत माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड आणि आमदार चौगुले यांना कोणत्याही परिस्थितीत मातीत गाडायचंच," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या बसवराज पाटील यांचाही शेलक्या शब्दांत त्यांनी समाचार घेतला.
भाजपाच्या गोमूत्रधारी हिंदुत्वासारखं आमचं हिंदूत्व नाही : "मी राज्यभर संवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहे. या सभेमध्ये इतर सर्वांसोबत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर येत आहे. आमचं हिंदुत्व हे सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणारं आहे. मात्र भाजपाच्या गोमूत्रधारी हिंदुत्वासारखं नाही," असं त्यांनी ठासून सांगितलं. "ही लढाई भावी पिढीसाठी असून उद्या आम्ही जिंकणारंच. ज्यांना भाजपामध्ये जायचे असेल, त्यांनी आता जावे," असा सल्लाही त्यांनी दिला. "भाजपानं जरी आमदार, खासदार विकत घेतले, तरी पन्नास खोक्यांमध्ये संपूर्ण राज्यातील जनता तुम्हाला विकत घेता येणार नाही," असा टोला त्यांनी यावेळी लागावला. "ही जनता लाचार नसून आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत," असा इशाराही त्यांनी मोदी - शाहा यांना दिलाय.
काळी संपत्ती गोळा करणार्यांना पहिल्या यादीत स्थान : "काळी संपत्ती गोळा करणार्या कृपाशंकर सिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळालं आहे. मात्र भाजपा वाढवण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. दिल्लीपुढं झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची," अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच महाविकास आघाडीत सामील होण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा :