मुंबई Uddhav Thackeray On Budget 2024 : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरुन विविध क्षेत्रातील प्रतिक्रिया येत असताना आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे तर सत्ताधाऱ्यांनी जनसामान्यांच्या हिताचा, सामान्य लोकांचा विचार करून सादर केलेला अर्थसंकल्प असं म्हटले आहे. तर या अर्थसंकल्पावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. "हे सरकार दहा वर्ष झोपलं होतं का," असा तिखट सवाल उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
मोदी सरकारचं शेवटचं बजेट : "मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचं बजेट आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अवघ्या 60 मिनिटांत बजेट सादर केलं आहे. मोदी सरकारचं हे शेवटचं. होय शेवटचं बजेट आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच "मी निर्मला सीतारामन यांना धन्यवाद देतो की, त्यांनी जड अंतकरणानं हे बजेट त्यांनी सादर केलं," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. "गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला यांच्यावर बजेटमध्ये भर देण्यात आल्यामुळं मी अर्थमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद देतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज पेन येथील जाहीर सभेत बोलत होते.
हा फक्त उद्योगपतींचा देश नाही : "अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये चार जातीचा समावेश केला आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलण्याचं हे धाडस दाखवलं. त्याबद्दल त्यांचे आभार. या देशात गोरगरीब, महिला, शेतकरी आहेत, हे आता या सरकारला कळलं. मागील दहा वर्षापासून यांना यांच्याबद्दल काही पडलं नव्हतं. सुटा-बुटातला आणि उद्योगपतींचा केवळ हा देश नाही, तर गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा देखील देश आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केली.
म्हणून आम्ही आता महिलांसाठी काम करणार : "आता बजेटमध्ये महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, त्या मणिपुरात जा. आणि त्यांना सांगा की, अहो आम्ही महिलांचा बजेटमध्ये समावेश केला आहे. कारण की आता यांना निवडणुकीच्या तोंडावर महिलांची आठवण आली आहे. महिलांची मत पाहिजेत, म्हणून यांनी महिलांचा समावेश केला," असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर केला. "बिल्कीस बानोकडं जा... आणि ज्या आरोपींना सोडलं होतं, त्या पीडित महिलांना जाऊन सांगा की, ताई आता आम्ही तुमच्यासाठीही बजेटमध्ये जागा दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणं वागणूक दिली, अत्याचार केले, त्या शेतकऱ्यांची आठवण आता या सरकारला झाली आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर यावेळी केली.
हेही वाचा :