मुंबई MHADA Building Collapsed in Vikroli : विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात गुरुवारी (30 मे) सायंकाळी म्हाडाच्या एका इमारतीचं छत अचानक कोसळलं. या घटनेत तळ मजल्यावर राहणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला असून विक्रोळी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मात्र, पावसाळ्यापूर्वीच इमारत कोसळल्यानं म्हाडाच्या जुन्या जीर्ण इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशात आलाय. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली. मात्र, यावेळी लोकांनी कोटेचा यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली.
दोघांचा मृत्यू, सरकार मात्र शांत : गुरुवारी सायंकाळी विक्रोळी पूर्व परिसरात म्हाडाच्या 40 क्रमांकाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या घटनेत तळ मजल्यावर राहणारे दोघं गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी त्वरित डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. सूर्यकांत म्हादळकर आणि शरद म्हसाळ अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. मात्र, या घटनेची अद्यापही सरकारकडून दखल घेण्यात आलेली नाही, यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
मुंबईत 188 धोकादायक इमारती : मुंबईत अनेक धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. पावसाळ्यापूर्वी रहिवाशांनी या इमारतींमधून स्थलांतरित व्हावं, अशी नोटीस महानगरपालिकेनं दिलेली असतानाही अनेकांनी अद्यापही आपली घरं खाली केलेली नाहीत. असं असतानाच आता पावसाळ्यापूर्वी ही घटना घडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं आता महापालिका काय पाऊल उचलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, प्रत्येक वर्षी मुंबई महानगरपालिका मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. यावर्षी देखील ही यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत सुमारे 188 धोकादायक इमारतींचा समावेश आहे.
हेही वाचा -