नागपूर : सीएसएमटी-शालिमार एक्सप्रेस दोन डबे हे रुळावरून खाली उतरल्याचं समोर आलंय. नागपूर जिल्ह्यातील कळमना येथं आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रेनचा S2 आणि पार्सलचा डब्बा रुळावरून घसरलाय.
ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम सुरू : सीएसएमटी-शालिमार एक्सप्रेस आज आपल्या निर्धारित वेळेत दुपारी 1 वाजता नागपूर रेल्वे स्टेशनकात दाखल झाली होती. नागपूर रेल्वे स्थानकात सर्व आवश्यक तपासण्या केल्यानंतर गाडी गोंदियाच्या दिशेनं निघाली असता, गाडी कळमना रेल्वे स्टेशन येथे दाखल झाली. त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक रेल्वेचे दोन डबे हे रुळाच्या खाली उतरले. रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे.
ट्रेन क्रमांक 18029 सीएसएमटी शालिमार एक्स्प्रेसचे दोन डबे S2 आणि पार्सल व्हॅन नागपूरजवळील कळमना स्टेशनजवळ रुळावरून घसरले. या घटनेत प्रवासी जखमी झाले नाहीत. प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन सुरू करून प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. - दिलीप सिंग, Sr DCM - दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू : घटनेच्या वेळी रेल्वेचा वेग कमी असल्यानं दुर्घटनेची तीव्रता कमी होती. रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनानं काम सुरू केलंय. या दुर्घटनेमुळं हावडा मुंबई या मार्गावरील काही गाड्या प्रभावीत होण्याची शक्यता आहे. काही गाड्यांच्या मार्गात बदल केले जाऊ शकतात. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वे मार्ग पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा