सातारा Satara Crime News : साताऱ्यातील माची पेठेत बुधवारी (3 ऑक्टोबर) झालेला स्फोट हा कॉम्प्रेसरचा नसून तो फटाक्यांच्या दारूमुळं झाला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आलंय. या पार्श्वभूमीवर बेकायदा स्फोटकं बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी साताऱ्यातून दोघांना अटक केली आहे. शाहीद हमीद पालकर आणि तबरेज गणी पालकर (रा. गुरुवार परज, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. न्यायालयानं त्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्फोटाच्या तीव्रतेमुळं सातारकर भीतीच्या छायेखाली : सातारकरांसाठी बुधवारची दुपार अतिशय भीतिदायक ठरली होती. भरदुपारी माची पेठेत झालेल्या भीषण स्फोटामध्ये चिकन सेंटरसह परिसरातील दुकानं उद्ध्वस्त झाली. या स्फोटात मुजमिल हमीद पालकर यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला एका दुकानातील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर एटीएस, बीडीएस आणि श्वान पथकानं घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक एक्सपर्टसनाही पाचारण करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावरील नमुने घेऊन ते फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत.
स्फोटकं बाळगल्याप्रकरणी मृताच्या चुलत भावांना अटक : फटाक्याची दारू जवळ बाळगून त्याचे 'आपट बार' बनवताना स्फोट झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळावरून घेतलेले स्फोटकाचे सर्व नमुने नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिलीय. याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ शाहीद हमीद पालकर आणि तबरेज गणी पालकर यांना अटक केल्याचंही त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा -
- साताऱ्यात सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट; एक जण जागीच ठार, दोन गंभीर जखमी, पाहा व्हिडिओ - Satara Compressor explosion
- सातारा ठोसेघर मार्गावर भीषण अपघात, खड्डा चुकवताना दोनशे फूट खोल दरीत कोसळली कार, पाच जण गंभीर जखमी - Satara Road Accident
- साताऱ्यात शिवशाही बसने महामार्गावर घेतला पेट, चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशी बचावले - Shivshahi Bus Fire Satara