बीड : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केल्याची घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणात आता ६ पैकी दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती, प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.
दोघांना पोलिसांनी केली अटक : "या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा पथकं स्थापन करण्यात आली आहेत. धाराशिव, बीडमध्ये पथकाकडून शोध सुरू आहे. या दरम्यान केज जवळील तांबवा गावातील शिवारातून जयराम माणिक चाटे वय २१ (रा.तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार वय २१ (रा. मैंदवाडी ता. धारुर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाचा मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या प्रकरणाशी संबंध आहे. यातील आरोपींना पुढील ४८ तासात अटक करू, त्यामुळं ग्रामस्थांनी शांतता राखावी", असं आवाहन सचिन पांडकर यांनी केलं.
आरोपींवर गुन्हा दाखल : मयत संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केल्याप्रकरणी, बीडच्या केज पोलीस ठाण्यात आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) याच्यासह अन्य पाच आरोपींवर कलम १४० (१),१२६, ११८(१), ३२४(४) (५), १८९ (२), १९१(२), १९० नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सचिन पांडकर यांनी दिली.
नेमकं काय घडलं? : मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख केज हून मस्साजोगच्या दिशेनं जात असताना डोणगाव फाट्याजवळ सहा अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवली होती. त्यांनी सरपंचांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. शिवराज यांनी घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांनी कळवली होती. पोलिसांच्या दोन पथकांनी संतोष देशमुख यांचा तपास सुरू केला होता. त्यानंतर केज ते नांदूर घाट रस्त्यावर दहीटना फाटा येथे संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार होते. पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला होता. घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते.
जुन्या भांडणाची कुरापत? : जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख केला होता. सुदर्शन घुले यांनी 6 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे अवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले मस्साजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप केला होता.
हेही वाचा -