चंद्रपूर Twin Brother Arrested In Fake Bomb Case : तुमच्या दुकानासमोर बॅाम्ब ठेवला आहे, असा मालकाला दूरध्वनी आल्यानं चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या दुकानमालकानं पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिल्यानं पोलीस यंत्रणाही हादरली. बॉम्बच्या अफवेनं शहरातही खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बॅाम्ब शोध पथकाला पाचारण केलं. त्यांच्या तपासणीत हा 'फुसका बॅाम्ब' असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या बॉम्बच्या अफवेनं मोठी खळबळ उडाली. बॉम्ब ठेवल्याची फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला असता, पोलिसांना खंडणीसाठी कर्जबाजारी असलेल्या जुळ्या भावांनी हा प्रताप केल्याचं उघड झालं. या प्रकरणात जुळ्या भांवडांना अटक करण्यात आली. आयुष धाबेकर आणि पियुष धाबेकर (वय 23)अशी आरोपींची नाव आहेत. ते चिमूर इथले रहिवासी आहेत.
कर्जबाजारी असल्यानं खंडणीसाठी ठेवला फुसका बॅाम्ब : कर्जबाजारी असल्यामुळे खंडणीसाठी हा फुसका बॅाम्ब दुकानासमोर ठेवल्याची कबुली या जुळ्या भावंडांनी दिली. मात्र या घटनेनं तब्बल दोन तास गडचांदूर शहर दहशतीत होतं. स्थानिक संविधान चौकात भगवती एनएक्स नावाचं कापड विक्रीचे दुकान आहे. 30 जुलैला दुपारच्या सुमाराला दुकान मालक शिरीष सुर्यकांत बोगावार यांना एका अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला. तुमच्या दुकानासमोर बॅाम्ब ठेवला आहे, असं बोगावार यांना समोरच्या व्यक्तीनं सांगितलं. त्यांनी दुकानासमोर बघितलं तेव्हा बॅाम्ब सदृश्य वस्तू एका पिशवीत असल्याचं आढळून आलं. त्यांनी त्वरीत याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस पथक पोहचल्यानंतर त्यांनाही दुकानासमोर एक संशयास्पद स्थितीत एक पिशवी आढळून आली. त्या पिशवीत एक वीजेचा दिवा बंद सुरु होताना दिसला. त्यामुळे पोलीसही हादरले. वरिष्ठांना त्याची माहिती देण्यात आली. शहरात बॅाम्ब असल्याची वार्ता पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी उसळली. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार घटनास्थळी दाखल झाले.
कर्जबाजारी जुळ्या भावंडांनी खंडणीसाठी केला प्रताप : बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस मुख्यालयातून बॅाम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलं. या पथकानं बॅाम्ब निकामी करण्याची प्रक्रिया राबविणं सुरु केलं. त्यांच्या तपासणीत पिशवीतील वस्तू बनावट बॅाम्ब असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. दुसरीकडं हा खोडसाळपणा करणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथक तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. तेव्हा दोन युवकांच्या दुकानांच्या समोरील हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्या दोघांना दोन तासांच्या आता पोलिसांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 308 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कोण आहेत आरोपी? : आयुष धाबेकर आणि पियुष धाबेकर दोघंही जुळे भाऊ आहेत. ते मुळचे चिमूर इथले रहिवासी आहेत. मागील तीन महिन्यांपासून ते गडचांदूर परिसरात प्लम्बिंगचं काम करत होते. त्यांच्यावर कर्ज होतं. या कर्जाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी दुकानासमोर फुसका बॅाम्ब ठेवून खंडणी मागण्याची योजना आखली. खंडणी मागण्यासाठी त्यांनी 'फुसका बॅाम्ब' ठेवला आणि पोलिसांच्या हाती लागले.
हेही वाचा :