मुंबई Train Accidents News: सलग दोनदा केंद्रात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणाऱ्या भाजपानं रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, ते सोडून हायस्पीड गाड्या आणि रेल्वेच्या खासगीकरणावर भर दिल्याचा उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघानं आरोप केला. रेल्वे प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललेला आहे. यामुळे आता पंतप्रधान यांनी रेल्वेमंत्र्यांच्या कारभाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली.
तीन वर्षांत तब्बल 131 रेल्वे अपघात: ओडिशा आणि पश्चिम बंगलामध्ये रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी यांच्या तीन वर्षाच्या कालावधीत किती रेल्वे अपघात झाले, याची रेल्वे मंत्रालयाकडे माहिती मागितली होती. त्यात वैष्णव यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात भारतीय रेल्वेत तब्बल 131 रेल्वे अपघात घडल्याची माहिती समोर आली. सध्या पावसांच्या दिवसांत गाड्या ट्रॅक वरून घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील उदाहरण घ्यायचं झाल्यास पावसाळ्यात सातत्याने ठप्प होणारी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेची वाहतूक हे उत्तम उदाहरण आहे.
काय सांगते आकडेवारी: रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जून 2021 ते 17 जून 2024 पर्यत भारतीय रेल्वेत एकूण 131 रेल्वे अपघात घडले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या अपघातामध्ये 92 अपघात हे तर रेल्वे गाड्या रुळावरुन घसरल्याने झाले आहेत. यामध्ये 64 प्रवासी रेल्वे गाड्या आणि 28 मालगाड्या रेल्वे रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वे मंत्रालयांनी आरटीआय उत्तरात दिल्याचे अजय बोस यांनी सांगितलं.
दर महिन्याला 2 प्रवासी रेल्वे गाड्या आणि एक मालगाडी रूळावरून घसरते: रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणाले की, "रेल्वे मंत्रांच्या कार्यकाळात इतके रेल्वे अपघात घडणे ही खूप गंभीर बाब आहे. यावर स्वतः पंतप्रधानांनी लक्ष घालावे. अपघात घडल्यानंतर रेल्वेकडून कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती पंतप्रधानांनी घ्यावी. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात 92 रेल्वे गाड्या रेल्वे रुळावरून घसरल्याची नोंद आहे. त्यानुसार, दर महिन्याला 2 प्रवासी रेल्वे गाड्या आणि एक मालगाडी रूळावरून घसरत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे संचालकावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे."
नरेंद्र मोदी हे रेल्वेमंत्री वैष्णव यांना पाठीशी घालत आहेत का? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून प्रवासी रेल्वे गाड्या सातत्याने रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटना घडत आहेत. कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघातात 300 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर, आत्तापर्यंत हजार लोकांनी रेल्वे अपघातात आपला जीव गमावला आहे. वैष्णव यांच्या काळात दर महिन्यात दोन प्रवासी गाड्या तर एक मालवाहतूक गाड्या घसरली आहे. असे असतानादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वेमंत्री वैष्णव यांना पाठीशी घालत आहेत का? असा सवाल बोस यांनी उपस्थित केला आहे. मागील मंत्रिमंडळात चांगली कामगिरी नसतानादेखील आत्ताच्या नवीन मंत्रिमंडळातदेखील त्यांच्यावर रेल्वेमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आता तरी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्रालयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष बोस यांनी केली आहे.
हेही वाचा