मुंबई Rahul Gandhi Rally In Mumbai : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी 20 ऑगस्टला विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेला मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं आक्षेप घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकलेला नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा संयुक्त मेळावा शुक्रवारी माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनंही मुंबईत सभेचं आयोजन केलं.
काँग्रेसच्या मुंबईतील सभेला पोलिसांचा आक्षेप : काँग्रेसच्या मुंबईतील सभेला वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडं आक्षेप नोंदवला आहे. 20 ऑगस्टला वांद्रे-कुर्ला संकुलाच्या फटाका मैदानात काँग्रेसची सभा आयोजित करण्यात आली आहे. नुकत्याच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या सायन इथल्या वाहतुकीच्या पुलाचं (ROB) कारण देत वाहतूक पोलिसांनी सभेला आक्षेप नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबत एमएमआरडीएकडं आक्षेप नोंदवला आहे.
वाहतूक कोंडी होण्याची भीती : वाहतूक पोलिसांनी काँग्रेसची सभा ही कार्यालयीन दिवसात होत असल्यानं मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त केली आहे. सायन इथल्या वाहतुकीचा पूल (ROB) बंद झाला आहे. तेव्हापासून वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतुकीवर ताण निर्माण होत असल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे.
राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेसची सभा : काँग्रेसच्या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खास उपस्थिती असणार आहे. या सभेला तब्बल वीस हजाराहून जास्त काँग्रेसचे कार्यकर्ते येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीनं मुंबईत ही सभा घेतली जाणार आहे. या सभेनिमित्त काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. मात्र या सभेच्या आधीच वाहतूक पोलिसांनी या सभेला परवानगी देण्याबाबत नो सिग्नल दिला आहे. एक ऑगस्टपासून सायन ROB बंद केल्यानंतर मध्य मुंबईसह वांद्रे-कुर्ला संकुलातील परिसरात मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सायन ROB बंद झाल्यापासून फटाका मैदानात होणारी ही पहिलीच मोठी सभा असणार आहे.
हेही वाचा :
- राहुल गांधींना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पाचव्या रांगेत जागा दिल्यानं वाद, संरक्षण मंत्रालयाकडून सारवासारव - Rahul Gandhi
- कोलकातामधील डॉक्टरच्या हत्या प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,"पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला.." - Rahul Gandhi
- "माझ्याविरोधात ईडीची छापेमारी होऊ शकते, पण मी..."; राहुल गांधींचा खळबळजनक दावा - Rahul Gandhi Claimed ED Raid