मुंबई Tiger Numbers Reduce In Maharashtra : राज्यातील वाघांची संख्या विविध कारणांमुळे कमी होत असून गेल्या दीड वर्षात राज्यातील सुमारे 67 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. वाघांच्या संरक्षणासाठी सरकारनं विविध उपाययोजना केल्या असून वाईल्ड लाईफ क्राईम सेलची स्थापना केल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. "राज्यातील वाघांची संख्या कमी होत असून सरकार याबाबत गांभीर्यानं विचार करत आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात सुमारे 67 वाघांचा मृत्यू झाला. विविध कारणांमुळे या वाघांचा मृत्यू झाला," अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या उत्तरात दिली.
2023 मध्ये इतक्या वाघांचा झाला मृत्यू : सन 2023 मध्ये राज्यात नैसर्गिकरित्या मृत्यू झालेले वाघ 26, अपघातामुळे मृत्यू झालेले वाघ 10, विषबाधेमुळे मृत्यू झालेले वाघ 2, विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झालेल्या वाघांची संख्या 9 तर शिकारीमुळे चार वाघांना जीव गमवावा लागला होता. एकूण 51 वाघांचा मृत्यू झाला. यावर्षी मे महिन्यापर्यंत नैसर्गिकरित्या 8 वाघांचा मृत्यू, अपघातानं 2 वाघांचा मृत्यू, विद्युत प्रवाहामुळे 1 आणि 5 वाघांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरू असून आतापर्यंत एकूण 16 वाघांचा मृत्यू झाला आहे. एकूणच गेल्या दीड वर्षात 67 वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
विद्युत प्रवाहामुळे वाघांचा मृत्यू : राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये जंगली प्राण्यांपासून रक्षणासाठी तारेचं कुंपण बांधतात. त्यात विद्युत प्रवाह सोडतात, तर अनेक शिकारी सुद्धा शिकार करण्यासाठी विद्युत प्रवाहाचा वापर करतात. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विद्युत प्रवाहामुळे 22 वाघांचा मृत्यू झाल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं आहे. तर वाघांच्या नखांची आणि कातडीची चोरी झाल्याचं आढळून येत नसून ही नखं अपघातानं तुटली असावी, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
वाघांच्या संरक्षणासाठी क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना : राज्यातील वाघांच्या संरक्षणासाठी क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्युत प्रवाहामुळे वाघांच्या आणि अन्य वन्य प्राण्यांचे मृत्यू होऊ नये, यासाठी वनविभाग आणि विद्युत महामंडळाला सनियंत्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अति संवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. शिकारी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एम स्ट्रिप्स प्रणाली असलेल्या मोबाईलचा पुरवठा क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे. वाघांचं भ्रमण मार्ग, पाणवठे, महत्वाच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवण्यात येत आहे. तसेच पाण्यामध्ये विषप्रयोग होऊ नये, यासाठी नियमित पानवठ्यांची तपासणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
वाईल्ड लाईफ क्राईम सेलची स्थापना : राज्यातील वन्य प्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अध्यायावत माहिती ठेवण्यासाठी वन्यजीव गुन्हे कक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपूर इथं स्थापन करण्यात आला आहे. तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असलेल्या सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेतला जात आहे. वन्यप्राणी येण्या जाणाऱ्या मार्गावर शिकाऱ्यांद्वारे लोखंडी ट्रॅप लावले नसल्याची खातरजमा करण्यात येत असल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी या उत्तरात स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :
- डरकाळी फोडत आला वाघ: मेळघाटच्या जंगलात पर्यटकांनी अनुभवला थरार; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा - Melghat Tiger Reserve
- सव्वा महिन्याच्या उपचारानंतर T- 53 वाघाला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं - Pench Tiger Reserve
- पारशिवनी परिसरात दहशत पसरवणारा वाघ जेरबंद; वन विभागानं रेस्क्यू केल्यानंतर उपचारादरम्यान वाघाचा मृत्यू - Tiger Died In Gorewada