अमरावती- दोन बाजूंनं पहाडांनी वेढलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ( Tiger in Amaravati) परिसरात बुधवारी रात्री इंग्रजी विभागाच्या इमारतीलगत वाघ दिसल्यानं खळबळ उडाली. विद्यापीठ परिसरात वाघ दिसल्यानं पहाटे फिरायला येणाऱ्यांना सावधतेच्या दृष्टीनं विद्यापीठ परिसरात प्रवेश नाकारण्यात आला.
रात्री सव्वानऊ वाजता दिसला वाघ- अमरावती विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या इमारती समोरच्या रस्त्यावर अतिशय शांतपणं भला मोठा वाघ आला. वाघानं थोडासा रस्ता पार करून पुन्हा वळण घेतलं. त्यानंतर त्याच मार्गानं वाघ शांतपणे निघून गेला. मराठी विभागाच्या इमारतीसमोर असणाऱ्या दोन सुरक्षारक्षकांनी हे दृश्य पाहिलं. विद्यापीठात बिबटे हे नेहमीच दिसतात. मात्र, समोर अचानक वाघ असल्यामुळं या दोन्ही सुरक्षारक्षकांची भांबेरी उडाली.
आंबेडकर थॉट्स अभ्यासक्रमाचा सुरू होता वर्ग- रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास विद्यापीठ परिसरात वाघ दिसला. त्यावेळी मराठी विभागाच्या इमारतीत 'आंबेडकर थॉट्स' या अभ्यासक्रमाचा वर्ग सुरू होता. परिसरात वाघ असल्यामुळं या अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बराच वेळपर्यंत इमारतीतच सुरक्षित राहावं लागलं.
कुलगुरू-कुलसचिवांनी घेतली धाव- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच विद्यापीठाच्या परिसरातच आपल्या निवासस्थानी असणारे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते हे परिसरात असणाऱ्या मराठी विभागाच्या इमारती समोर पोहोचले. काही वेळातच कुलसचिव डॉ. अविनाश असनारे हेदेखील विद्यापीठात आले. विद्यापीठात तैनात असणारे सुरक्षा कर्मचारीदेखील मराठी विभागाच्या इमारती समोर धावून आलेत. यावेळी सर्वप्रथम आंबेडकर थॉट्स अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या विद्यापीठाच्या बाहेर काढण्यात आलं. वनविभागालादेखील या संदर्भात माहिती देण्यात आली. यानंतर या परिसरातील सुरक्षारक्षकांना रात्री मराठी विभागाच्या इमारतीत असणाऱ्या ए. व्ही थिएटरमध्येच थांबण्यास सांगण्यात आलं.
होय, विद्यापीठात दिसला वाघ!- "रात्री सव्वानऊ साडेनऊ वाजेच्या दरम्यान विद्यापीठ परिसरात वाघ असल्याची माहिती कळताच कुलगुरूंसह मी देखील वाघ दिसलेल्या परिसरात पोहोचलो. विद्यापीठात बिबटे हे नेहमीच दिसतात. आता विद्यापीठात सुरक्षारक्षकाला वाघ दिसला. सुरक्षारक्षकानं अतिशय खात्रीपूर्वक वाघच पाहिला असं सांगतो आहे. वाघा संदर्भात आम्ही वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या वतीनं सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आलं. पहाटे अंधारातच विद्यापीठ परिसरात फिरायला येणाऱ्यांना आज रोखण्यात आलं. या भागात प्रत्येकानं काळजी घेणे गरजेचं आहे", असं कुलसचिव डॉ. अविनाश असणारे यांनी सांगितलं.
24 डिसेंबरला बिबट्याला केलं जेरबंद- विद्यापीठ परिसरात यूजीसी गेस्ट हाउस लगतच्या भिंतीजवळ दडून बसलेलं बिबट्याचं पिल्लू सुरक्षारक्षकांना दिसलं होतं. वनविभागाच्या बचाव पथकाच्या मदतीनं 24 डिसेंबरला या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.
हेही वाचा-