बुलढाणा : येथील अमडापूरजवळ शुक्रवारी (13 डिसेंबर) रात्री एका भरधाव अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या हिट अँड रन घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अमडापूर पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. प्रतिक भुजे (वय 25 वर्षे), प्रथमेश भुजे (वय 26 वर्षे) आणि सौरभ शर्मा या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. यातील प्रतिक आणि प्रथमेश हे चुलत भाऊ होते, तर सौरभ त्यांचा मित्र होता.
असा घडला अपघात : बुलढाण्यात अमडापूर येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या हिट अँड रन प्रकारामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. बुलढाण्यातील चिखलीहून उदयनगरकडे हे तीन तरुण जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे चिखलीला काही कामानिमित्त गेले होते. परत येत असताना रात्री 1.30 वाजेच्या सुमारास अमडापूरच्या टिपू सुलतान चौकात भरधाव वेगानं जाणाऱ्या एका अज्ञात वाहनानं या तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, तिघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वाहनाचा शोध सुरू आहे.
वाहन चालकानं पळ काढला : अपघातानंतर अज्ञात वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. काहीतरी मोठा आवाज झाल्यानं बाजूला एका दुकानात झोपलेल्या तरुणाला जाग आली. बाहेर येवून त्यानं जेव्हा हे दृश्य पाहिलं, तेव्हा तो हादरला. त्यानं तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तिघांनाही चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं.
पोलिसांकडून तपास सुरू : अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग घेतला जात आहे. अज्ञात वाहनचालकाविरोधात कलम 106 (1) 281, भारतीय न्याय संहिता सहकलम 134/177 एमव्ही अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निखील निर्मळ यांनी दिली.
हेही वाचा