नंदुरबार : शहजादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेला दत्त जयंतीपासून सुरुवात होते. ही यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असल्यानं महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा यासह विविध राज्यातील अश्वप्रेमी चेतक फेस्टिवलमध्ये सहभागी होतात. यात अश्वांच्या विविध स्पर्धाचं आयोजन करण्यात येतं. त्याचबरोबर देशभरातून नामांकित आणि उच्च प्रतीचे अश्व चेतक फेस्टिवलमध्ये सहभागी होतात. आजपर्यंत जवळपास 2000 पेक्षा अधिक अश्व विक्रीसाठी सहभागी झाले होते. गेल्या वर्षी अश्व विक्रीतून जवळपास चार कोटींची उलाढाल झाली होती. यंदाही विक्रम नोंदविला जाईल असा विश्वास आयोजक जयपालसिंह रावल यांनी व्यक्त केला आहे.
एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रोत्सवाला प्रारंभ : सारंगखेडा येथे एकमुखी दत्तप्रभूंच मंदिर आहे. दरवर्षी येथे दत्त जयंतीला 20 ते 22 दिवस यात्रा भरते. ही यात्रा घोडे बाजार आणि बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. येथे शेतीचे साहित्य आणि घर संसारोपयोगी वस्तूची मोठी विक्री होते. तसंच या यात्रेत गोडशेव प्रसिद्ध आहे. यंदा यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. महिला आणि पुरुषांसाठी मंदिरात स्वतंत्र दर्शन रांग केली आहे. पावणेचारशे वर्षापासून संपूर्ण गावातून दत्तप्रभूंची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. यासाठी यंदा मंदिर प्रशासनानं पंधरा लाखाचा आकर्षक रथ करुन घेतला आहे. या रथातून रात्री मिरवणूक काढून महाआरती करण्यात येते.
चेतक फेस्टिवलमध्ये आरोग्य सेवा : या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह आचार्य, संत, महंत, महानुभाव अनुयायी उपस्थित राहणार आहेत. वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा करण्यात आल्याची माहिती, कनिष्ठ अभियंता चेतन खैरनार यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र वळवी, प्राथमिक आरोग्य केंद्र दोन वैद्यकीय अधिकारी, प्रतिनियुक्तीवर 12 डॉक्टर, 36 आरोग्य कर्मचारी यांच्याकडून सारंगखेडा येथे तीन पथकात आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. तसंच भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अतिरिक्त बसेसची सोय करण्यात आली आहे. घोडेबाजारातील वीज, पाणी, घोड्यांना आरोग्य व्यवस्था पुरवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी प्रयत्न करत आहेत.
यात्रेवर ड्रोनद्वारे असणार नजर : पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. 10 पोलीस अधिकारी, 200 पुरुष पोलीस कर्मचारी, 50 महिला पोलीस कर्मचारी, 200 गृहरक्षक दल, 50 पुरुष आणि महिला होमगार्ड, स्वान पथक, बॉम्ब शोध पथक आणि ड्रोनद्वारे व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.
यात्रेसाठी वाहतुकीत बदल : सारंगखेडा मार्गे जाणार्या अवजड वाहनांमुळं वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी, जिल्हा प्रशासनाने अनरदबारी ते सारंगखेडा तापी पुला दरम्यान 14 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत वाहतूक मार्गात बदल केला आहे. दोंडाईचाकडून शहादा मार्गे गुजरातकडं जाणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुलीवरुन नंदुरबार-प्रकाशा मार्गे जातील. गुजरात राज्याकडून अक्कलकुवा-तळोदा मार्गे येणारी वाहने प्रकाशा पुलावरुन नंदुरबार मार्गे दोंडाईचाकडं येतील. शहादाकडून दोंडाईचाकडं जाणारी वाहने शहादा-अनरदबारी, शिरपूर मार्गे आणि धुळ्याहून शहाद्याकडं जाणारी वाहने सोनगीर फाट्यावरुन शिरपूर येथून वडाळी अनरदबारी मार्गे शहाद्याकडं जातील. हे वाहतुकीचे नियम जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी जारी केले आहेत.
हेही वाचा -