पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज (14 डिसेंबर) ते प्रथमच पुण्यात आले होते. यावेळी त्यांना पुण्याचा अजेंडा काय असणार? असं विचारलं असता ते म्हणाले, "पुण्याचा अजेंडा हा अडीच वर्षापूर्वीच सेट केला आहे. आत्ता त्या अजेंड्याला गती देणं हे महत्त्वाचं आहे."
पुणे पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. "पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. वाचन संस्कृतीला चालना देणारे कार्यक्रम होत आहेत. गेल्या वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो. पुणेकरांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला होता. सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमानं माझ्या कामाची सुरुवात होत आहे. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि भाजपात संघर्ष : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 20 दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटलाय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर आज (14 डिसेंबर) अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. दरम्यान पुण्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि भाजपात संघर्ष पाहायला मिळत आहे. पुण्याचं पालकमंत्री पद भाजपाला मिळावं, अशी भूमिका पुण्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत विचारलं असता त्यांनी सर्व माहिती लवकरच मिळेल, असं उत्तर दिलं आहे.
दादर हनुमान मंदिर प्रकरणी प्रतिक्रिया : दादरच्या हनुमान मंदिराविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "न्यायालयानं मागच्या काळात निर्णय देऊन मंदिराची कॅटेगिरी केली आहे. जुनी मंदिरं ही त्या वर्गवारीनुसार नियमित करता येतात. याबद्दल रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू."
हेही वाचा