शिर्डी : साईबाबा संस्थानच्या वतीनं साजरा करण्यात येत असलेल्या तीन दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवांची आज गोपालकाल्याच कीर्तनानं दहीहंडी फोडून सांगता करण्यात आलीये. साईबाबा संस्थानच्या वतीनं 106 वा साईबाबा पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या तीन दिवसांच्या उत्सवात लाखो भाविकांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
फुलांनी सजवलेली दहीहंडी फोडत उत्सवाची सांगता : साईबाबा संस्थानच्या वतीनं साई मंदिरात परंपरागत गुरुपौर्णिमा, रामनवमी आणि विजयादशमी असे तीन उत्सव साजरे होतात. त्यातील एक म्हणजे साईबाबा पुण्यतिथी अर्थात दसऱ्याचा उत्सव. 11 ऑक्टोबर पहाटे काकड आरतीनं सुरु झालेल्या या तीन दिवसाच्या उत्सावाची आज साईंच्या मध्यान्ह आरतीपूर्वी साई समाधी मंदिरात आकर्षक फुलांनी सजवलेली दहीहंडी साई संस्थान आणि मानकर्यांकडून फोडत उत्सवाची सांगता करण्यात आलीय.
'हे' आहे पुण्यतिथीचं महत्त्व: साईबाबांनी 104 वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्या दिवशी मंगळवार होता. 1999 साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव नव्या उत्साहात साजरा केला जात आहे. ज्यामुळे विजयादशमी म्हणजे साईबाबांची पुण्यतिथी, अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्त हा उत्सव साजरा करतात. शिर्डी येथे या पुण्यतिथी उत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.
साईबाबांच्या 42 अध्यायात बाबांच्या महानिर्वाणाचं महत्त्व: श्री साईसच्चरिताच्या 42 व्या अध्यायात बाबांच्या महानिर्वाणाचं वर्णन करण्यात आलं आहे. हेमाडपंत म्हणतात, बाबांचे एक भक्त रामचंद्र पाटील कोते एकदा अतिशय आजारी पडले. जीवावरचे संकट त्यांना सोसवत नव्हते. कोणताच उपाय बाकी राहिला नव्हता. जीव अगदी नकोसा होऊन गेला. अशा अवस्थेत एका मध्यरात्री बाबांची मूर्ती एकाएकी रामचंद्र पाटलांच्या उशापाशी प्रकटली.
हेही वाचा