पुणे- फळांचा राजा अशी ओळख असलेला यंदाच्या सिझनमधील पहिला आंबा हा पुण्यातील मार्केटयार्डमध्ये दाखल झालाय. दरवर्षी देवगड येथून हापूस आंबा हा मार्केट यार्ड येथे दाखल होत असतो, पण यंदा देवगड येथील साद मुल्ला या शेतकऱ्याकडून केसर या आंब्याची पेटी ही मार्केट यार्ड येथे दाखल झाली असून, आज झालेल्या लिलावात सव्वा पाच डझनाच्या पेटीला तब्बल 31 हजार रुपयांचा भाव मिळालाय.
31 हजारांत मोसमामधील पहिल्या आंब्याची पेटी : मार्केटयार्ड येथील व्यापारी तसेच संचालक बापू भोसले यांच्या गाळ्यावर आज देवगड येथील साद मुल्ला या शेतकऱ्याकडून केसर या आंब्याची पेटी पोहोचवली आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबा मिसाळ आणि विविध व्यापाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या लिलावात रावसाहेब कुंजीर यांनी 31 हजार रुपयांत मोसमामधील पहिल्या आंब्याची पेटी खरेदी केलीय.
15 मार्चनंतर आंब्याच्या सिझनला सुरुवात : तसेच मार्केट कमिटीचे संचालक बापू भोसले म्हणाले की, देवगड येथून मोसमातील पहिला आंबा हा आज मार्केट यार्ड येथे दाखल झालाय. साद मुल्ला या शेतकऱ्याच्या बागेतून हा आंबा आलाय. यंदा केसर या आंब्याची लागवड ही मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने पहिली पेटी ही केसर या आंब्याची आलीय. यावर्षी 15 मार्चनंतर आंब्याच्या सिझनला सुरुवात होणार आहे. पावसाळा जास्त दिवस राहिल्यानं आंबा उशिरा मार्केटमध्ये दाखल होईल, असा अंदाज आहे. आज पहिल्या पेटीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचंही बापू भोसले म्हणालेत.
46 वर्षांपासून मार्केटमध्ये प्रथम येणारा आंबा : यावेळी व्यापारी रावसाहेब कुंजीर म्हणाले की, गेल्या 46 वर्षांपासून मार्केटमध्ये प्रथम येणारा आंबा हा मी अनेकदा खरेदी करीत असतो. अनेक लोक आणि परदेशात राहणारे जे लोक आहेत, ते सातत्याने आंब्याबाबत माझ्याकडे चौकशी करीत असतात. आता मी त्यांच्याशी संपर्क करीत त्या लोकांना हा आंबा देणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा
- साडेतीन टन केशर आंबे साईचरणी अर्पण; साईबाबा भाविकांना आमरसाची मेजवानी - Sai Baba Prasadalaya
- नागपुरात आंबा, तृणधान्य महोत्सवाला सुरुवात; गडचिरोलीच्या 'गोला' आंब्यानं भरली रंगत - Mango Millet Festival Nagpur 2024