पालघर Yayati Gawad : "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" या गीतातील उक्तीप्रमाणे डहाणू तालुक्यातील चिखले येथील एका पीठ गिरणी चालकाची मुलगी ययाती गावड हिने गगनभरारी घेतल्याचं दिसतं. ययाती गावड हिने आतापर्यंत अनेक विक्रम राष्ट्रीय पातळीवर नोंदवले असून तिची शिक्षणाची जिद्द आणि क्रिकेट विषयीची तिची आस्था, त्यासाठी ती घेत असलेले परिश्रम या जोरावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या भारतीय महिला क्रिकेट संघात खेळण्याची तिची इच्छा आणि स्वप्न निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास तिच्या पालकांना आणि प्रशिक्षकांनाही आहे.
जिद्दीपुढे परिस्थितीनेही टेकले हात - ययाती हिच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. डहाणू तालुक्यातल्या चिखले या छोट्याशा गावात तिने प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. नंतर ती माध्यमिक शिक्षणासाठी बोर्डीला गेली. बोर्डी येथे असतानाच डहाणू येथे एका शिबिराला गेली असता तिच्यातील क्रिकेटचे गुण प्रशिक्षक महेश पाटील यांनी हेरले आणि तिला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच मार्गदर्शन केले.
पहिला गुरू वडील - ययाती हिचे वडील क्रिकेटचे चाहते असून त्यांनीही घरी तिला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले. वडील शैलेंद्र हे तर तिच्यासोबत अनेकदा अनेक क्रिकेटच्या सामान्यांना उपस्थित राहिले. मुंबईला लहान असताना ती जेव्हा सरावाला जायची, तेव्हा तिचे वडील तिच्यासोबत दररोज पालघर ते मुंबई असा प्रवास करायचे. तिचा सराव संपेपर्यंत थांबून राहायचे. आई गृहिणी असली, तरी तिचाही ययातीला मोठा पाठिंबा आहे. ययातीसाठी आईचा दिवसही भल्या पहाटे सुरू होतो.
शाळेत हजेरीचा राष्ट्रीय विक्रम - शाळेविषयी आणि अभ्यासाविषयी जिद्द किती असावी, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ययाती हिने सात वर्षात एकही सुट्टी न घेता शाळेत हजेरी लावून एक राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. ‘हंड्रेड परसेंट अटेंडन्स इन स्कूल’ हा विक्रम ग्रामीण भागात तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. वर्गात मन लावून शिकणे आणि घरी दिलेला अभ्यास पूर्ण करणे हे तत्त्व तिने सातत्याने पाळले.
मैदान आणि शाळाही गाजवली - अभ्यासात ययाती हुशार होतीच. त्याची प्रचिती दहावीत तिला मिळालेल्या गुणावरून येते. दहावीच्या परीक्षेत तिला ९२ टक्के गुण मिळाले. एकीकडे मैदान गाजवत असतानाच दुसरीकडे ती गुणवत्तेची शिखरे ही गाठत होती. नववीत असतानाच तिला क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि ही आवड जोपासत ती स्थानिक स्पर्धा खेळत गेली. तिच्यातील गुण ओळखत तिला तसे प्रशिक्षक लाभत गेले. राजू अंभिरे आणि भरत चामरे यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले.
ऑलराऊंडर खेळाडू - गेल्या एक वर्षापासून महिलांच्या १९ वर्षाखालील गटात ती क्रिकेट खेळते. भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत ती ४० सामने खेळली आहे. १९ वर्षाखालील महिलांच्या मुंबई क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व तिने केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या तीन सामन्यात तिने अकरा विकेट घेतल्या. तर ४६ धावा काढल्या. टी-२० स्पर्धेत तिने आठ विकेट घेतल्या. या स्पर्धेत मात्र फलंदाजी तिच्या वाट्याला आली नाही. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १६ सामन्यात तिने एकूण १८ विकेट घेतल्या. हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना तिने वीस धावा देऊन चार विकेट घेतल्या. ऑलराऊंडर खेळाडू अशी तिची ओळख आहे.
जिद्द आणि परिश्रम करण्याचा संदेश - मुंबईच्या १९ वर्षाखालील महिलांच्या सराव सामन्यांसाठीच्या संघाची कर्णधार म्हणून ययाती हिची निवड करण्यात आली आहे. मुंबई महिला क्रिकेट संघाच्या अध्यक्ष सुनीता सिंग, अपर्णा चव्हाण, संगीता कामत, वीणा परळकर, कल्पना बोरकर यांच्या निवड समितीने १६ जणांचा संघ निवडला असून ययाती ही या संघाची कर्णधार असणार आहे. ग्रामीण भागातील मुले जिद्द, परिश्रमाच्या जोरावर आणि स्पष्ट ध्येय असेल, तर कितीही संकटे आली तरी त्यावर मात करू शकतात, हे ययातीच्या उदाहरणावरून दिसते.
सरावासाठी दररोज तीनशे किलोमीटर प्रवास - ययाती वांद्रे-कुर्ला येथील शरद पवार इनडोअर गेम हॉलमध्ये दररोज सामन्याच्या सरावासाठी जाते. त्यासाठी ती दररोज सुमारे तीनशे किलोमीटरचा प्रवास करते. त्यासाठी पहाटे तीनला उठून सर्व तयारी करून पहाटे चार चाळीसची लोकल पकडून ती मुंबईला जाते आणि दिवसभर सराव केल्यानंतर रात्री परत येते. सुरुवातीला तिच्या या प्रवासात तिचे वडील शैलेंद्र बरोबर असायचे; परंतु नंतर ती एकटीच दररोज मुंबईला जाऊन सराव करीत आहे. स्थानिक स्पर्धा आणि भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या वतीने भरवण्यात येणाऱ्या स्पर्धात किती फरक असतो, स्पर्धा किती चुरशीची असते आणि खेळाडू किती तयारीचे असतात हे तिला छोट्या छोट्या गोष्टीतून शिकता आले.
स्वप्नपूर्तीचा विश्वास - आई-वडिलांच्या कठीण परिस्थितीतील पाठिंब्याबद्दल ती सातत्याने कृतज्ञता व्यक्त करते आणि भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची स्वप्नपूर्ती दोन-तीन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास तिला वाटतो आहे.
हेही वाचा..