ठाणे Thane Raging Case : बारावीचे पेपर सुरू असतानाच रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला. बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थाला त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यानं पाच मित्रांशी संगनमत करून माळरानावरील टेकडीवर नेऊन नग्न करत बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ शूट केल्यानं त्या पीडित विद्यार्थानं आत्महत्या केली. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण अन् टेकडीवरून फेकण्याची धमकी: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय विद्यार्थी हा मुरबाड तालुक्यातील खोपिवली गावात कुटुंबासह राहत होता. तालुक्यातील एका महाविद्यालयात तो बाराव्या वर्गात शिक्षण घेत होता. तो २१ फेब्रुवारी रोजी पहिलाच इंग्रजी पेपरच्या परीक्षेला बसला होता. त्याला त्याच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं त्याच्या पाच मित्रांच्या साथीनं त्याची रॅगिंग केली. घटनेविषयी विद्यार्थ्यानं त्याच्या आईला माहिती दिली होती. त्यावेळी त्याच्यासोबत आणखी काही मित्रही होते. त्याच मित्रांसोबत तो घाईघाईनं निघून गेला. त्यानंतर आरोपी विद्यार्थानं त्याच्या इतर मित्रांसह विद्यार्थ्याला दुचाकीवर बसवून एका फार्म हाऊसमध्ये नेलं. आरोपींनी येथून त्याला निर्जनस्थळी असलेल्या टेकडीवर नेलं. त्यानंतर पाचही जणांनी दारू आणि सिगारेट पीत एकानं विद्यार्थ्याला मोबाईलमध्ये काही तरी दाखवत मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर विधिसंघर्षग्रस्त मुलानंही त्याला बेदम मारहाण करत त्याच्या अंगावरील कपडे काढत त्याला नग्न करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. तसेच त्याला टेकडीवरून फेकण्याची धमकीही दिली.
शेवटी विहिरीत आढळला मृतदेह: पीडित विद्यार्थी २१ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा रात्री घरी आला. मात्र, घडलेल्या प्रकाराबाबत त्यानं कोणालाही काही सांगितलं नव्हतं. परंतु, २२ फेब्रुवारी रोजी अचानक घरी कोणालाही काही न सांगता तो निघून गेल्यानं त्याचा घरच्यांनी शोध सुरू केला. यावेळी त्याचा मोबाईल, चप्पल आणि काही वस्तू त्याच्याच शेतातील विहिरीलगत आढळून आल्या. त्याचा मृतदेह त्याच्या शेतात असलेल्या विहिरीत आढळून आला. कुटुंबानं त्याचा मृतदेह ताब्यात घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र २३ फेब्रुवारी रोजी अचानक त्याचा मोबाईल नातेवाईकांनी चेक केला असता त्यामधील फोटो गॅलरीत त्यानं लिहून ठेवलेली सुसाईट नोट (चिठ्ठी) दिसून आली.
तिघांना न्यायालयीन कोठडी: या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर म्हणाले, " पीडितच्या ४२ वर्षीय वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून २४ फेब्रुवारी रोजी २ विद्यार्थ्यांसह ४ जणांवर मुरबाड पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. आतापर्यंत पाच विधिसंघर्षग्रस्तांना अटक केली करण्यात आली. दोन विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन असल्यानं त्यांची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा: