पुणे- दौंड तालुक्यामध्ये नरभक्षक बिबट्यांनी दुसरा बळी घेतल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बिबट्याने शेतमजुरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. वनविभागामार्फत दौंडमधील नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. लता धावडे या शेतकरी महिलेवर बिबट्यानं हल्ला केला असून, तिचा जागीच मृत्यू झालाय.
बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण ठार : दौंड शेजारील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरातदेखील बिबट्याने मनुष्यावर हल्ले केल्याचे प्रकार घडलेत. दौंडलगतच्या या भागातील गावात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण ठार झालेत. बिबट्याने हातवळण येथील शेतमजुरावर 8 डिसेंबर रोजी सकाळी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हातामध्ये कोयता बघून बिबट्याने तेथून पळ काढला. बिबट्याची दहशत दौंड तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगार, मजुरी करणारे कामगार यांच्यामध्ये पसरलीय. त्यामुळे आता वनविभागाने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.
10 वर्षांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली : दौंडच्या पश्चिम भागातील मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढू लागलाय. गेल्या 10 वर्षांमध्ये तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली. सुरुवातीच्या काळामध्ये उसाच्या शेतामध्ये बिबट्या आढळू लागले. या काळात ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात रानडुकरांनी हैदोस घातला होता. मात्र काही दिवसांत संपूर्ण रानडुकरांचा फडशा बिबट्यांनी पाडला असल्याचे चित्र आहे. ऊसातील रानडुकरे संपली, त्यामुळे बिबट्या खाद्याच्या शोधात भटकू लागले. पाळीव कुत्री, पाळीव प्राणी यांच्यावर होणारे हल्ले वाढलेत. अनेक शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याने खाऊन फस्त केलीत. मात्र दौंड तालुक्यातील वनविभागाने म्हणावी तशी पावलं उचलली नाहीत, असं नागरिकांचं म्हणणं आहे.
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरं : यापूर्वी असलेल्या दौंड तालुक्यातील वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दौंडचं 'गोंडस कल्याण' केलंय. अनेकदा त्यांच्या कार्यकाळामध्ये पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. परंतु पिंजरा उपलब्ध होत नाही, अशा प्रकारची टोलवाटोलवीची उत्तरे शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना ऐकावी लागत होती. 17 नोव्हेंबर रोजी दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावच्या हद्दीत ऊसतोड कामगारांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या चिमुरड्याचा नाहक बळी गेला. वनविभागाने पावले उचलत पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. 7 डिसेंबर रोजी कडेठाण येथील शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केलाय. यात महिलेचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या दिवशी लगेच 8 डिसेंबरला हातवळण येथील शेतमजुरावर हल्ला करण्याचा बिबट्यानं प्रयत्न केलाय. मात्र सुदैवाने त्यात शेतमजूर वाचला. दरम्यान, यवत परिसरातील कामटवाडी येथे रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटनादेखील नुकतीच घडलीय.
बिबट्याचा हा प्रजनन काळ : दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलीय. ठराविक भागात दिसणारे बिबटे आता तालुक्यात काही ठिकाणी दिसू लागलेत. बिबट्याचा हा प्रजनन काळ आहे. साखरेचा हंगाम सुरू असल्यामुळे ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऊस क्षेत्रात बिबट्याला लपण्यास जागा मिळते. खाद्यही मिळते. मात्र ऊस तोडणी सुरू झाल्यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीत हस्तक्षेप वाढलाय. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे पुरेशी यंत्रणा नाही. पिंजरे कमी पडतात. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचाही अभाव आहे. बिबट्या नरभक्षक झाला आहे का? त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली आहे का? हे शोधणे आवश्यक आहे. त्यानुसार योग्य कार्यवाही होणे गरजेचे आहे.
मानव अन् बिबट्या संघर्ष अटळ : बिबट्या सध्या माणसावर हल्ला करीत आहे. माणसाच्या रक्तात क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रक्ताची चटक बिबट्यांना लागते. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत, नाही तर ग्रामीण जीवन विस्कळीत होऊन मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष वाढत जाईल.
मानवी वस्तीत बिबट्या आणि तत्सम जंगली प्राण्यांचा वावर वाढला : शेतकरी आणि कामगारांनी शेतात जाताना काळजी घ्यावी. दौंड तालुक्यातील अनेक गावामंध्ये मानवी वस्तीत बिबट्या आणि तत्सम जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, मानवावर बिबट्याचे हल्ले वाढलेत. त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी टास्क फोर्स आणि पिंजरे लावण्याची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्याला त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, असंही दौंडचे आमदार राहुल कुल म्हणालेत.
हेही वाचा-